ब्रायन बर्झिक ही अशी अफलातून व्यक्ती आहे, की तो झोपल्यानंतर त्याला जागे करण्याची हिंमत कोणाचीही होत नाही, अशी त्याच्याबद्दल चर्चा आहे. याचे कारण असे, की तो चक्क अजगरांबरोबर झोपतो. अनेकांना पाळीव प्राणी उशाला घेऊन झोपण्याची सवय असते. उदाहरणार्थ गलेलठ्ठ मांजर किंवा छोटा कुत्रा इत्यादी. पण ब्रायनची सवय जगावेगळी आहे. त्याने अजगर पाळलेले आहेत. त्यांच्याशी त्याची चांगली मैत्रीही झालेली आहे. स्वतःचे काम वगळता इतर वेळ तो त्यांच्यासमवेतच घालवतो. इतर कोणत्याही जिवंत प्राण्यासाठी कर्दनकाळ असणारे हे अजगर ब्रायनला मात्र आपला मित्र मानतात. ब्रायन त्यांच्यासमवेत झोपतो.
त्यामुळेच त्याची ‘याला कोणीही जागे करू शकत नाही’, अशी ख्याती निर्माण झाली आहे. कारण अजगरसमवेत असताना कोणीही त्याच्याजवळ गेला तर ते आ वासून त्याच्या अंगावर झेपावतात. त्यामुळे अशा व्यक्तीला मागे सारावे लागते. ब्रायन केवळ अजगरच नव्हे तर इतर सापांचाही मित्र असून त्यात विषारी सापांचाही समावेश आहे. किंगकोब्राच्या माथ्याचे चुंबनही तो घेऊ शकतो. लहानपणापासूनच आपल्याला ही सवय असल्याने अजिबात भय वाटत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. सापांबरोबर आश्चर्यकारक व्हिडिओज त्याने तयार केले असून ते प्रसिद्धही झालेले आहेत. त्याचा हा अनोखा छंद त्याला जागतिक प्रसिद्धी देऊन गेला आहे.