ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला होता. या दौऱ्याला उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. उत्तरभारतीयांची हात जोडून माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, पायावरच्या शस्त्रक्रियेच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी हा दौरा स्थगित केला. पण मनसैनिक बृजभूषण यांच्या विरोधाला न जुमानता ठरल्याप्रमाणे आज अयोध्येत दाखल झाले आहेत.
ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. तिथून त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, आज 5 जून. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा काही कारणास्तव रद्द झाला. पण मनसैनिकांनी हा दौरा पूर्ण करत मराठी माणसाचा स्वाभिमान जपला. आम्ही ठरवल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच. काहीवेळापूर्वीच आम्ही अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूनने घेतलं पाहिजे. आज मी इथे आलो आहे. मी प्रत्येक मराठी बांधवांना विनंती करतो की, तुम्ही अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाला या.
येथे येण्यापासून आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो. मराठी माणसाला कोणीही चँलेंज करायचे नाही. आम्ही आलोय. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळय़ांना जागा दाखवून देऊ, असा इशाराही अविनाश जाधव यांनी यावेळी बृजभूषण सिंह यांना दिला.