आरोपी स्वप्ना सुरेश यांचा दावा ः केरळचे मुख्यमंत्री विजयन अडचणीत
वृत्तसंस्था/ कोची
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केरळमध्ये सोने तस्करी प्रकरणाचा मुद्दा तापला होता. या प्रकरणाने केरळला हादरवून सोडले होते. सत्तारुढ डाव्या आघाडीसाठी तापदायक ठरलेल्या या प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेशने मुख्यमंत्री पिनराई विजयन, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही वरिष्ठ अधिकाऱयांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. 2016 मध्ये विजयन यांच्या दुबई दौऱयादरम्यान युएईत चलनाची तस्करी करण्यात आली होती असे तिने म्हटले आहे.
संयुक्त अरब अमिरातच्या महावाणिज्य दूताच्या निवासस्थानातून अनेकदा सोन्याची तस्करी करण्यात आली. सोन्याची बिस्किटे बिर्याणीच्या मोठय़ा डब्यांमध्ये ठेवून मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत पोहोचविण्यात आल्याचा आरोप स्वप्नाने केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी नाकारले आरोप
मुख्यमंत्री विजयन यांनी आरोप नाकारले आहेत. हे आरोप सरकार आणि राजकीय नेतृत्वाच्या विरोधातील एका राजकीय अजेंडय़ाचा हिस्सा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्वप्नाने याप्रकरणी मुख्यमंत्र्याचे माजी मुख्य सचिव एम. शिवशंकर यांच्या विरोधात यापूर्वी जाहीरपणे आरोप केले होते. स्वप्नाने आता पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केले आहेत.
सोनेतस्करीचे स्वरुप
16 महिने तुरुंगात राहिल्यावर स्वप्नाला जामीन मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱयांसमोर सीआरपीसीचे कलम 164 अंतर्गत जबानी दिल्यावर तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विजयन, त्यांच्या पत्नी कमला, कन्या वीणा, शिवशंकर, माजी खासगी सचिव सी.एम. रविंद्रन, माजी मंत्री के.टी. जलील आणि माजी आयएएस अधिकारी नलिनी नेट्टो यांचा सोन्याच्या तस्करीत हात होता असे स्वप्नाने म्हटले आहे.
2016 पासून सोने तस्करी
सोने तस्करीचे सत्र 2016 मध्ये मुख्यमंत्री विजयन दुबई दौऱयावर गेल्यापासून सुरू झाले. तेव्हा शिवशंकर यांनी माझ्याशी पहिल्यांदा संपर्क साधला होता. मुख्यमंत्री स्वतःसोबत एक बॅग नेण्यास विसरले आहेत, ही बॅग त्वरित दुबईला न्यायची असल्याचे शिवशंकर यांनी सांगितले होते. तेव्हा युएईच्या वाणिज्य दूतावासातील एका अधिकाऱयाला बॅग घेऊन दुबईत पाठविण्यात आले होते. वाणिज्य दूतावासात स्कॅनिंग यंत्रात बॅगची तपासणी केल्यावर त्यात चलनी नोटा असल्याचे आढळून आले. याचबरोबर शिवशंकर यांच्या निर्देशांनुसार अनेकदा अधिक वजनाच्या बिर्याणीच्या मोठय़ा डब्यांमध्ये सोने ठेवून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचविण्यात आल्याचा दावा स्वप्नाने केला आहे.