कारखाना पूढील हंगामात स्वबळावर की भाडेतत्वावर चालवावा यासाठी सभा
गडहिंग्लज प्रतिनिधी
आप्पासाहेब नवलडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याच्या विशेष सभेत सत्ताधारी आणि विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. कारखाना चालवण्यास द्यायचा की नाही या विषयावर प्रशासनाकडून बोलवण्यात आलेल्या सभेत गोंधळ होताचा राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. यानंतर कार्यकर्ते, नेत्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून सभा तहबूक करावी अशी मागणी केली तर दुसऱ्या गटाने विषय मंजूर झाला म्हणून घोषणा देत सभा मंडप सोडले. या गोंधळात मात्र प्रशासक आणि पोलीसांची मोठी भंभेरी उडालेली पहायला मिळाली.
गडहिंग्लज कारखान्याची विशेष सभा कारखाना कार्यस्थळावर प्राधिकृत अधिकारी तथा सहकार निबंधक अरूण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पूढील हंगाम घेण्यासाठी कारखाना स्वबळावर की भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यासाठी या विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. प्राधिकृत अधिकारी लेखा परिक्षक करणसिंह पाटील यांनी स्वागत केल्यानंतर उपनिबंधक अमर शिंदे सभेचा हेतू स्पष्ट केला. तर श्री. काकडे यांनी अध्यक्षीय भाषण करत कारखान्याची वस्तुस्थिती मांडली आणि सभासद, उस उत्पादकांच्या मनोगतानंतर कारखाना चालवण्यास द्यायचा की, नाही या विषयावर मत घेणार असल्याचे सांगितले. यानंतर शिवाजीराव खोत, राजेंद्र गड्डयान्नवर, माजी संचालक सतिश पाटील, माजी संचालक अमर चव्हाण यांची मनोगत व्यक्त केली. माजी व्हा. चेअरमन प्रकाशराव चव्हाण बोलताना सभासद, सेवानिवृत्त कामगारांनी विविध विषयावर गोंधळ घालण्यास सुरूवात केली. जवळपास एक तासाहून अधिक काळ आरडाओरड सुरूच होता. शेवटी कारखाना चालवण्यास देण्याचा विषय गदारोळात मंजूर करण्यात झाला. त्यानंतर अधिकाऱयांना अमर चव्हाण, माजी चेअरमन ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखून धरले पण पोलीस बंदोबस्तात त्यांची सुटका करण्यात आली. अभुतपूर्व गोंधळात झालेल्या सभेची जोरदार चर्चा उशिरापर्यंत तालुक्यात सुरू होती.