हिक्किम पोस्ट ऑफिसचे बदलले स्वरुप
1983 पासून हिक्किम गावात जगातील सर्वात उंचीवरील पोस्ट ऑफिस कार्यरत आहे. या अनोख्या पोस्ट ऑफिसला आता नवा लुक देण्यात आला आहे. समुद्रसपाटीपासून हे पोस्ट ऑफिस 14 हजार फुटांच्या उंचीवर आहे.
हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पीति येथील काजामध्ये दरवर्षी मोठय़ा संख्येत पर्यटक येत असतात. येथे किब्बर, की मॉनेस्ट्री, लांग्जा आणि हिक्किम यासारख्या गावांना पर्यटक भेट देत असतात. जगातील सर्वात उंचीवरील पोस्ट ऑफिस काजाच्या हिक्किम गावातच आहे. पूर्वी हे पोस्ट ऑफिस एका खोलीत चालविले जात होते, परंतु आता याला डाकघरचे नवे रुप मिळाले आहे.
जगातील सर्वात उंचीवरील मोटरेबल गाव असलेल्या हिक्किममध्ये देशातील पहिले पत्रपेटीच्या स्वरुपातील पोस्ट ऑफिस आता सुरू झाले आहे. भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकारी वंदिता कौल यांच्याहस्ते याचा शुभारंभ केला आहे.
देशभरात अशाप्रकारचे पोस्ट ऑफिस नाही, हे खरोखरच आकर्षणाचे केंद्र आहे. हिक्किम पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पर्यटक देशविदेशातील स्वतःच्या आप्तांना पत्रं पाठवतात. पर्यटनाच्या दृष्टीकोनातुन देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण ठरले असल्याचे कौल यांनी म्हटले आहे. शिमल्यापासून येथे पोहोचण्यासाठी सुमारे 500 किलोमीटरचे अंतर कापावे लागते.