घरफाळा जमा असतानाही 20 हजार मिळकतधारकांना बीले : टपालसाठी 4 लाखांचा खर्च वाया : अजब महापालिकेचा गजब कारभार
विनोद सावंत/कोल्हापूर
शहरातील तब्बल 20 हजार मिळकतधारकांनी घरफाळा जमा केला असतानाही त्यांना महापालिकेकडून बील वाटप करण्यात येत आहेत. पोस्टाने बील वाटप केले जात असल्याने अशा मिळकत धारकांवरील पोस्टल खर्च वाया जात आहे. तब्बल 4 लाखांचा खर्च वाचविणे शक्य होते, मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
जकात, एलबीटी बंद झाल्याने महापालिकेचे घरफाळा हे उत्पन्नाचे मुख्यस्त्राsत आहे. त्यामुळेच महापालिकेचा 100 टक्के घरफाळा जमा होण्यासाठी नेहमी प्रयत्न असतो. मात्र, घरफाळय़ाची बीलेच मिळत नसल्याने बील कसे भरणार असा प्रश्न मिळकतधारक नेहमी उपस्थित करतात. यावर पर्याय म्हणून महापालिकेने गेल्या काही वर्षापासून बीले पोस्टाने पाठविण्यास सुरू केले आहे. चारही विभागीय कार्यालयांतर्गत असणाऱया घरफाळा विभागाकडून मिळकतधारकांना बीले देण्यासाठी पोस्टात दिली आहेत. त्यामुळे पुढील आठवडय़ात सर्व मिळकतधारकांना बीले मिळतील. मात्र, ज्यांनी घरफाळा जमा केलेला आहे. अशा मिळकतधारकांनाही बीले दिली जात आहेत. विशेष म्हणजे गरज नसताना यामुळे पोस्टचा खर्च वाया जात आहे. बारकोडने बीले पाठवली जात असल्याने एक बीलासाठी पोस्टाला 21 रूपये खर्च येत आहे.
कर जमा केलेली 20 हजार बीलांचे पोस्टाने वाटप
महापालिकेने 6 टक्के सवलत योजना आणली आहे. घरफाळा बील छपाई करून पोस्टाने पाठविण्यास अवधी लागणार असल्याने सवलत योजनेचा लाभ मिळकतधारकांना होण्यासाठी घरफाळा विभागाने जुनी बीले अथवा ग्राहक क्रमांक घेऊन नागरी सुविधा केंद्रात बील जमा करण्याचे आवाहन केले होते. मिळकतधारकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला. 20 हजार मिळकतधारकांनी घरफाळा जमा केला. वास्तविक त्यांना पोस्टाने बीले देणे गरजचे नव्हते. मात्र, बील जमा केलेल्या या मिळकतधारकांनाही पोस्टाने बीले दिली जात आहेत.
… तर 4 लाख रुपये वाचले असते
उत्पन्न कमी, खर्च जास्त झाल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची आहे. कर्मचाऱयांचे पगारही राज्य शासनाकडून मिळणाऱया जीएसटीच्या अनुदानावर अवलंबून आहे. अशा स्थितीत खर्च कमी करणे हाच एकमेव पर्याय आहे. असे असताना मनपा अधिकारी मात्र, याचा विचार करत नसल्याचे दिसून येत आहे. पैसे जमा झालेल्या 20 हजार मिळकतधारकांना जर पोस्टाने बीले पाठविली नसती तर महापालिकेचे 4 लाख रूपये वाचले असते.
दोन वर्षापूर्वी करून दाखवले मग आता का नाही
तत्कालिन कर निर्धारक संजय भोसले यांनी 2019-20 या आर्थिक वर्षाची बील पोस्टाने वाटप करत असताना दक्षता घेतली होती. त्यांनी घरफाळा जमा केलेल्या मिळकतधारकांची यादी काढून त्यांची बीले पोस्टाने न पाठविता बाजूला काढून ठेवली. तब्बल 40 हजार बीलांचा यामध्ये समावेश होता. यामुळे पोस्टावरील 8 लाखांची बचत झाली होती.
पोस्टाने बीले वाटप एकूण मिळकतधारक -1 लाख 51 हजार
एक बील पोस्टाने पाठविण्यासाठी खर्च-21 रूपये
बील जमा केले असतानाही बीले वाटप मिळकती-20 हजार
महापालिकेचा तोटा-4 लाख
बीले वाटपाबाबत दोन मतप्रवाह
घरफाळा भरला तरी नियमातील तरतुदीनुसार संबंधितांना बील देणे क्रमप्राप्त आहे. बील रेकॉर्डला ठेवण्यासाठी तसेच नेमका कोणता कर आकारला याची माहिती समजते. केवळ प्रिंटींग व्यवस्थीत न होणारी बील पोस्टाने पाठविली जात नाहीत.
घरफाळा जमा असताना बीले पाठवून पोस्टाचा खर्च न करता संबंधित कार्यालयामध्ये बीले उपलब्ध ठेवणे. बील पाहिजे असल्यास कार्यालयातून बील घेऊन जाण्याचे आवाहन करून पोस्टावरील खर्च वाचवणे.