प्रतिनिधी /पणजी
पोर्तुगीजांनी गोमांतकीयांवर प्रचंड अत्याचार केले. बाटवाबाटवी सारख्या प्रकारांना लोकांना सामोरी जावे लागले. त्याकाळी थोर क्रांतीकारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पोर्तुगीजांना हाकलून लावले म्हणून आज आम्ही गोव्यात मोकळा श्वास घेऊ शकतो. असे वक्तव्य क्रांतिदिनाचे अवचित साधून विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कुल कामुर्लीचे मुख्याध्यापक श्री संदीप पाळणी यांनी केले.
या निमित्त पीपल्स हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी पीपल्स हायस्कूल ते श्री पोरेश्वर मंदिर, दरबारवाडा पर्यंत पदयात्रा केली. तसेच कुचेली येथील शाहिद रामचंद्र शिवाजी शिंदे यांच्या स्मारकास त्यांच्या कुटुंबीया समवेत भेट दिली व शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप पाळणी यांनी स्मारकास पुष्पहार अर्पण करून शहीद रामचंद्र शिवाजी शिंदे यांच्या आईस मानचिन्ह प्रदान केले. शाळेच्या शिक्षिका सौ. स्नेहा नाईक यांनी डॉ राममनोहर लोहिया तसेच गोमांतकाचे सुपुत्र शहीद रामचंद्र शिवाजी शिंदे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संपूर्ण कार्यक्रम शाळेचे शारिरीक शिक्षक श्री पांडुरंग पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.