प्रतिनिधी /बेळगाव
वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड संस्थेचा ऑरगॅनिक ड्राय प्रुट्स प्रॉडक्ट लाँचिंगचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेने सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणी आपली कार्यप्रणाली संस्थेचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केली आहे. दि. 12 जून रोजी सर्वोच्च सेनाधिकारी लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम (रिटायर्ड) आणि त्यांच्या धर्मपत्नी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन संस्थेचे चेअरमन शिवाजी डोळे, डेव्हलपमेंट डायरेक्टर यल्लाप्पा झंगरूचे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कर्नाटक राज्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व निवृत्त झालेल्या कर्नलपासून शिपाईपर्यंतचे सर्व अधिकारी, माजी सैनिक एकत्रित झाले होते. प्रारंभी चेअरमन शिवाजी डोळे यांनी प्रास्ताविकात उद्देश, प्रगती आणि भविष्यात उभारण्यात येणाऱया योजना मांडल्या. संपूर्ण भारतात वेंकटेश्वरा संस्थेतर्फे सेंद्रीय शेतीकामाचे उत्पादन आणि प्रोसेसिंग करून परदेशात निर्यात करण्यात आले आहे. शेती महामंडळाकडून घेतलेल्या ओसाड जमिनीवर जवान आणि किसान यांनी एकत्र येऊन स्थानिक मजुरांच्या मदतीने हरियाली फुलविली. त्यातून द्राक्षे, आले, डाळींब, कांदा, लसूण, मका, ऊस, चिकू, आंबा, काजू, मत्स्यपालन, दूध डेअरी आणि शेळी पालन अशा विविध प्रकारांचे उत्पादन घेऊन एक चमत्कार घडविला. भविष्यात कर्नाटक राज्यामध्येही सर्व योजना आखण्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी सर्व सभासदांना आणि प्रमुख पाहुण्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.