उत्तर प्रदेशचे सभापती सतीश महाना यांचा सल्ला : आमदारांसाठीच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप
प्रतिनिधी /पणजी
जनतेने दिलेल्या मतांमुळेच आज आपण येथे आहोत याचे प्रत्येक लोकप्रतिनिधीने सदोदित स्मरण ठेवावे व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहून विश्वासास पात्र ठरण्याचे प्रयत्न करावे. त्याचबरोबर आपल्या कार्याद्वारे हर व्यक्तीच्या चेहऱयावर समाधान असेल याची खातरजमा करावी, असा सल्ला उत्तर प्रदेशचे सभापती सतीश महाना यांनी दिला.
गोवा विधानसभेतर्फे आमदारांसाठी आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. राजधानीत झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेचे रविंद्र साठे आणि विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांची उपस्थिती होती. त्याशिवाय अन्य मान्यवरांमध्ये युपी चे माजी राज्यपाल राम नाईक तसेच उत्तरप्रदेश विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीप दुबे यांची खास उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. महाना यांनी, ’शिक्षण हे कधीच थांबत नसते. माणसाने जीवनभर शिकत राहावे. त्यावेळी आपला गुरू आपल्यापेक्षा वयाने मोठा की लहान याचाही अहंभाव बाळगू नये. कारण त्याच्याकडून मिळणारे ज्ञान महत्वाचे असते. ते आत्मसात करत राहावे’, असे सांगितले. प्रत्येकाच्या जीवनात कोण ना कोण विरोधक हा असतोच. तो नसेल तर माणसाच्या जीवनाला अर्थ राहणार नाही. हाच नियम राजकारणातही लागू होतो. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने विरोधकांचे म्हणणेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवावी, असा सल्लाही श्री. महाना यांनी दिला. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा देत राज्य आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणादरम्यान सर्वप्रथम या शिबिराचे आयोजक तसेच त्यात सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले. ज्यांनी हे सत्र चुकविले त्यांनी खरोखरच एक चांगली संधी गमावली, असे ते म्हणाले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम एखाद्या संस्थेने आयोजित केला होता म्हणून त्यावर बहिष्कार घालणे योग्य नव्हे. कारण प्रशिक्षण देणारी संस्था स्वतःच्या ध्येय धोरणांचा प्रचार करण्यासाठी येथे आली नव्हती. या संस्थेने आतापर्यंत देशभरातील शेकडो आमदार, मंत्री, खासदार, नगरसेवक, पंचसदस्य यांना प्रशिक्षण दिले आहे आणि ते केवळ भाजपचेच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, यासारख्या अन्य पक्षांशी संबंधित आहेत. त्यातील काहींना संस्थेतर्फे त्यांच्या राज्यात जाऊन प्रशिक्षण देण्यात आले तर महाराष्ट्र सारख्या राज्यातील आमदारांनी स्वतः त्या संस्थेत जाऊन प्रशिक्षण घेतले आहे. यावरून संस्थेच्या कार्याची व्याप्ती लक्षात यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रशिक्षणावर बहिष्कार टाकणाऱयांनी या बाबींचा स्वतः अभ्यास करावा, तसेच हे शिबीर पंचतारांकित हॉटेलात आयोजित केले या कारणास्तव काहीजण उपस्थित राहिले नसतील तर सभापतींनी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा असेच शिबीर विधानसभा संकुलात आयोजित करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
सभापती रमेश तवडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यावेळी बोलतांना त्यांनी विरोधी आमदारांनी या शिबिरावर बहिष्कार टाकल्याबद्दल नाखुशी व्यक्त केली. सदर संस्था ही या क्षेत्रातील देशातील एक अग्रगण्य व प्रसिद्ध संस्था असून त्यांच्याकडे असंख्य तज्ञ आहेत, ते देशभरात काम करत आहेत. त्यांच्या अनुभवकथनाचा खरोखरीच प्रत्येक आमदाराने लाभ घ्यायला हवा होता, असे तवडकर म्हणाले.