प्रतिनिधी /मडगाव
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मुळगांवहून निघालेले वारकरी पथक काल महाराष्ट्रातील सांगोला येथे पोचले होते. आज गुरूवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल होणार आहे. या पथकात सुमारे 150 वारकऱयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पथकात मडगावच्या पत्रकार सौ. अनुराधा मोघे (70) यांचा समावेश आहे.
या वारकरी पथकाला वाटेत चार-पाच ठिकाणी पाऊस लागला. मात्र, सांगोला येथे अजिबात पाऊस नव्हता अशी माहिती सौ. मोघे यांनी दिली. वाटेत चहा-नास्ता तसेच स्वयंपाक केला जातो. सोबत पाण्याचा टंकर तसेच इतर सामान घेऊन वाहने या पथकासोबत गेली आहेत. आपण दररोज पाच ते सहा तास वारकऱयासोबत चालत जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपली ही पहिलीच पायी वारी असून विठ्ठल-रखुमाईच्या आशीवार्दाने सर्व काही सुरळीत चालू असल्याचे सौ. मोघे म्हणाल्या. आपण रिंगण देखील घातले. पंढरपुरची वारी म्हणजे एक आनंदोत्सव असतो. विठ्ठलाच्या नावाचा दिवस-रात्र गजर करीत वारकरी पंढरपुरकडे रवाना होत आहे. सर्व परिसर भक्तीमय झाल्याचे त्या म्हणाल्या. मुरगांवच्या वारकरी पथकात सर्वात वयस्क वारकरी हा 81 वर्षाचा आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे मुखदर्शन घेतल्यानंतर या वारीची सांगता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.