तामिळनाडूतील घटना ः तोडफोड करणाऱया 300 जणांची चौकशी
वृत्तसंस्था/ कल्लाकुरिची
तामिळनाडूतील कल्लाकुरिचीनजीक सोमवारी एका शाळेच्या दोन शिक्षकांना एका विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. 17 जुलै रोजी झालेल्या हिंसक घटनांमध्ये सामील असणे आणि शाळेत तोडफोड करण्याच्या आरोपाप्रकरणी सुमारे 300 जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली जात असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. तर न्यायालयाने मृतदेहाची पुन्हा उत्तरीय तपासणी करण्याचा आदेश दिला आहे.
विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी रविवारी 70 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर शाळा व्यवस्थापनात वरिष्ठ पदे भूषवित असलेल्या एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली होती. विद्यार्थिनीच्या कुटुंबाने गणित तसेच रसायनशास्त्र शिकविणाऱया दोन शिक्षकांवर मुलीचा छळ केल्याचा आरोप केला होता.
कल्लाकुरिचीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर चिन्नासेलमच्या कनियामूर भागातील एका खासगी वसतीशाळेत 12 वीत शिकणारी 17 वर्षीय मुलगी 13 जुलै रोजी वसतीगृह परिसरात मृतावस्थेत आढळून आली होती. कल्लाकुरिची हे ठिकाण चेन्नईपासून सुमारे 260 किलोमीटर अंतरावर आहे. मुलीची खोली वसतीगृहाच्या तिसऱया मजल्यावर होती. मुलीने वरच्या मजल्यावरून उडी घेत कथितरित्या आत्महत्या केली होती. परंतु शवविच्छेदन अहवालात मृत्यूपूर्वी मुलीच्या शरीराला अनेक जखमा झाल्या होत्या असे समोर आले.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मुलीचे आईवडिल, नातेवाईक तिच्या मृत्यूप्रकरणी अनेक प्रकारचे संशय व्यक्त करत न्यायाची मागणी करत आहेत. कल्लाकुरिची आणि कुड्डालोर दोन्ही जिल्हय़ांमध्ये यासंबंधी निदर्शने सुरू आहेत.