अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे प्रतिपादन
मँचेस्टर / वृत्तसंस्था
अलीकडे गोलंदाजीतही उत्तम सूर सापडलेल्या हार्दिक पंडय़ाने यापुढेही आपण आपली जबाबदारी स्मार्ट पद्धतीने पार पाडण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. मी यापुढे सातत्याने गोलंदाजी करत राहीन. पण, ज्यावेळी गरज असेल त्याचवेळी जलद मारा करेन, असे तो म्हणाला.
यापूर्वी तंदुरुस्तीच्या समस्येमुळे गोलंदाजी करु शकत नसताना हार्दिक पंडय़ाला संघातील जागा देखील गमवावी लागली होती. मात्र, नंतर त्याने आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून जोरदार कमबॅक केले. अगदी अलीकडे त्याने इंग्लंडमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर सरस प्रदर्शन साकारले.
हार्दिक पंडय़ाच्या फलंदाजीतील योगदानाबाबत काहीच साशंकता नव्हती. मात्र, गोलंदाजीतही त्याने इंग्लंडविरुद्ध उत्तम कामगिरी बजावली. 28 वर्षीय पंडय़ाने टी-20 व वनडे मालिकेत 4-33 व 4-24 अशी लक्षवेधी गोलंदाजी केली. रविवारी जोरदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर त्याने सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
रविवारच्या सामन्यातील गोलंदाजीविषयी बोलताना तो म्हणाला, ‘मी माझ्या सर्व षटकात प्रतितास 130 किमी वेगाने गोलंदाजी केली. त्यापेक्षा अधिक वेग वाढवणे शक्य होते. पण, मी परिस्थितीनुरुप मारा करण्याच्या उद्देशाने वेग मर्यादित राखला. येथील मैदान मोठे होते आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांनी मोठे फटके मारावेत, असे माझे प्रयत्न होते. त्यांनी स्क्वेअर लेग, फाईनलेगवर तैनात क्षेत्ररक्षकावरुन फटके मारण्याचा प्रयत्न करावा, या उद्देशाने मी वेगवान मारा करण्याऐवजी मर्यादित वेग कायम ठेवला. वास्तविक, बुमराहसारख्या अव्वल गोलंदाजाची उणीव भरुन काढणे सहजसोपे नव्हते. पण, डेथ ओव्हर्सबरोबरच मधल्या षटकातही प्रतिस्पर्धी फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला’.
कोट्स
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या वनडेतील नाबाद 125 धावांची खेळी माझ्यासाठी प्रदीर्घकाळ संस्मरणात राहील. मी एकावेळी फक्त त्या एकाच चेंडूपुरता विचार करुन खेळलो. संघ अडचणीत असताना, अशी धीरोदात्त, संयमी खेळी साकारण्याचे महत्त्व वेगळे असते. इंग्लंडमध्ये खेळण्याचा मी नेहमीच आनंद लुटत आलो असून हा दिवसही त्याला अपवाद नव्हता.
-भारतीय फलंदाज-यष्टीरक्षक रिषभ पंत
एकाच लढतीत अर्धशतक व 4 बळी (भारतीय खेळाडू )
खेळाडू / वर्ष / प्रतिस्पर्धी / ठिकाण
कृष्णम्माचारी श्रीकांत / 1988 / न्यूझीलंड / विशाखापट्टणम
सचिन तेंडुलकर / 1998 / ऑस्ट्रेलिया / ढाका
सौरभ गांगुली / 1999 / श्रीलंका / नागपूर
सौरभ गांगुली / 2000 / झिम्बाब्वे / कानपूर
युवराज सिंग / 2008 / इंग्लंड / इंदोर
युवराज सिंग / 2011 / आयर्लंड / बेंगळूर
हार्दिक पंडय़ा / 2022 / इंग्लंड / मँचेस्टर.