एकीकडे आमदार, खासदार बाहेर पडल्याने शिवसेनेत फुट पडल्याचा लाभ उठवण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसही पुढे सरसावली आहे. कोंडफणसवणेचे माजी सरपंच व शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर उर्फ अप्पा इंदुलकर आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह सोमवारी सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये स्वगृही परतल्याने पूर्व विभागात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
राज्यात सध्या शिवसेनेत घमासान सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस यांची महाविकास आघाडी असताना पक्षप्रवेश काहीसे थांबले होते. मात्र आता सेनेतील फुट व सत्तांतरानंतर सेनेतील दुफळीचा लाभ राष्ट्रवादी घेताना दिसू लागली आहे. माजी आमदार निशिकांत जोशी, बाळासाहेब माटे यांच्या काळातील सक्रिय कार्यकर्ते असलेले इंदूलकर राष्ट्रवादीचे पोफळी गटातील नेते दादा साळवी यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मध्यंतरी ते शिवसेनेत गेले होते. त्यांना स्वगृही आणण्यात माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सावर्डे येथील कार्यक्रमात इंदूलकर यांच्या समवेत सेनेचे माजी शाखाप्रमुख तुकाराम जाधव, चंद्रकांत उर्फ बुवा जाधव, सुधाकर इंदुलकर, मोहन जाधव, शिवाजी पवार, महेश इंदुलकर, सचिन कदम, किरण इंदुलकर आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, सूर्यकांत खेतले, नितीन ठसाळे, बाबू साळवी, जयंत शिंदे, उस्मान सय्यद, नीलेश कोलगे, रवींद्र रहाटे, माजी उपसरपंच बाबा कुटरेकर, कोंडफणसवणेचे उपसरपंच सुरेश शिगवण, ग्रामस्थ प्रवीण कदम, शाम कदम, बाळकृष्ण जाधव, विलास जाधव, लक्ष्मण जाधव, प्रतीक कदम, बारकू शिगवण, भरत कदम, सूर्यकांत कदम, सुनील जाधव, सुनील कदम, विजय जाधव आदी उपस्थित होते.