प्रतिनिधी /काणकोण
चावडी, काणकोण येथील स्व. बाबुसो नाईक यांच्या कॅफे सेंट्रल हॉटेलच्या इमारतीचा एक भाग कोसळला असून मडगाव-कारवार महामार्गाच्या बाजूला असलेली ही इमारत धोकादायक बनली आहे. सदर इमारत जवळजवळ 200 वर्षांपूर्वीची असून स्व. बाबुसो नाईक यांचे हॉटेल त्यात आहे. स्व. नाईक हे गोवा मुक्तीनंतरचे तालुक्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेते होते. एकेकाळी नावारूपाला आलेले सदर हॉटेल नाईक यांच्या निधनानंतर एकदम ढासळले. सध्या त्यांचे पुत्र आनंद नाईक सदर हॉटेल चालवत आहेत.
या इमारतीचे मूळ मालक स्व. शंकर रामा नाईक असून स्व. बाबुसो नाईक यांना भाडेपट्टीवर सदर हॉटेल चालवायला दिले होते, अशी माहिती स्व. शंकर रामा नाईक यांच्या तिसऱया पिढीतील शंकर नाईक यांनी दिली. या इमारतीसमोरच्या मूळ व्हरांडय़ावर सध्या दोन छोटी दुकाने आहेत. 200 वर्षे जुनी सदर इमारत धोकादायक बनल्यानंतर त्याची दुरुस्ती करणे वा त्या जागी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आपण हॉटेलमालक आनंद नाईक यांच्यासमोर ठेवला होता. त्यासाठी हॉटेल ज्या जागी आहे त्या बांधकामाचा खर्च देणे त्याचबरोबर मूळ करारानुसार हॉटेलचे भाडे देणे असा प्रस्ताव आपण ठेवला होता. मात्र सदर प्रस्तावावर पुढे चर्चा झाली नाही आणि निर्णयही झाला नाही. या इमारतीचा अर्धा भाग कोसळल्यानंतर त्याच इमारतीच्या शेजारी असलेल्या आपल्या दुकानाला धोका निर्माण झाल्याने आपण सध्या आपले दुकान बंद ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हॉटेलचे मालक आनंद नाईक यांच्याशी यासंबंधी संपर्क साधला असता, जमीनमालकाशी यासंबंधी चर्चा झाली नव्हती, उलट अमूक रक्कम देतो, दुकान सोडून चला अशी सूचना जमीनमालकाने दिली होती, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी आपण ठेवलेला प्रस्ताव त्यांनी मानला नाही. सध्या आपले हॉटेल व्यवस्थित चालत असून त्या ठिकाणी सकाळी वर्तमानपत्रांची विक्री देखील चालू आहे. लवकरच त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.