जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश
प्रतिनिधी/ सातारा
शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत. एक मुळचा ठाकरे यांचा गट तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट. सातारा जिह्यामध्येही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ठाकरे गटातून जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेला धक्का देत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे जिह्यातील मुळ शिवसेनेला गळती लागली असून आणखी कोण कोण शिंदे गटात जाणार याचीच चर्चा सध्या सुरु आहे.
सातारा जिह्यातूनच मुळचे शिवसेनेत उठावाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव सातारा जिह्यातील तर त्यांच्यासोबत असलेले तत्कालिन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांनी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत साथ दिली आहे. दरम्यान, मुळच्या शिवसेनेमध्ये एकही शिवसेनेचा पदाधिकारी हा शिंदे गटात गेला नव्हता असा दावा शिवसेनेच्यावतीने करण्यात येत होता. तोच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच एकेकाळचे निष्ठावान असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. त्यांनी विकासासाठी गटात जात असल्याचे जाहीर केले असले तरीही त्यांच्याबाबत शिवसेनेत आधीपासून प्रचंड नाराजी होती. शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यास त्यांच्याकडून ताकद दिली जात नाही. स्वतः पुरते बघतात. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक सुद्धा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्यापासून दोन हात लांब असतात. शिवसेनेतून गेले ते बरे झाले अशी जोरदार चर्चा शिवसेनेत सध्या सुरु आहे.