जत दुय्यम निबंधक कार्यालयासमोर प्रकार
जत / प्रतिनिधी
गावच्या पंचाकडे आणि प्रशासनाकडे न्यायासाठी दाद मागूनही न्याय न मिळाल्याने वाळेखिंडी येथिल तरूण शेतक-याने रागाच्या भरात थेट जत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात असणाऱ्या दूरध्वनीच्या खांबावर चढून न्याय मागण्याचा स्टंट केला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला, याची जत शहर व तालुक्यात जोरदार चर्चा सुरू होती.
वाळेखिंडी ता. जत येथिल शेतकरी बापूसाहेब नारायण शिंदे यानी त्यांच्या शेतात विंधन विहीर खोदली होती. या विंधन विहीरीला चांगले पाणी लागल्याने बापूसाहेब शिंदे यांच्या भाऊबंदाने या विंधन विहीरीवर असलेल्या विद्यूत मोटारीसाठी आकडा टाकून चोरून विज कनेक्शन घेतले होते.
परंतु विजमंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सबंधितांवर गुन्हा दाखल करून चोरून वापरत असलेला विद्युत पुरवठा बंद केला. त्यानंतर बापूसाहेब शिंदे यानी आपल्या भावकीतील लोकांना कायदेशिर विद्यूत कनेक्शन घ्या व विज वापरा असे सांगितले. परंतु संबंधीत लोकानी त्यांचे काहीही ऐकले नाही. उलट बापूसाहेब यांनाच मारहाण केली.
या विषयी बापूसाहेब यानी गावच्या पंचाकडे दाद मागितली परंतु पंचानीही बापूसाहेब यांचे न ऐकता त्यांची दाद घेतली नाही. यानंतर त्यांनी जत पोलीसात दाद मागीतली परंतु पोलीसांकडूनही त्यांना कसलीच मदत मिळाली नाही.
आज शुक्रवारी बापूसाहेब हे आपल्या जमिनीसंदर्भात वाटप प्रकरण कामी जत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात आले होते. परंतु बापूसाहेब व त्यांच्या भावकित असलेल्या जमिनीचे वाटप प्रकरण हे जत तहसिलदार यांच्याकडे असल्याने त्यांच्या भावकितील लोक हे या परिसरात दिसत नसल्याने बापूसाहेब यांच्या रागाचा पारा चढला व ते झटपट जत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात असलेल्या दूरध्वनीच्या खांबावर चढले व जोरजोरात मला न्याय पाहीजे म्हणून ओरडू लागले.
बापूसाहेब शिंदे हे दूरध्वनीच्या खांबावर चढून वर टोकापर्यंत पोहचल्याने या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी वाढली. यावेळी जत नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश माने व अन्य लोकानी त्याला समजावून खाली उतरायला भाग पाडले. त्यानंतर बापूसाहेब शिंदे यानी आपल्यावर आपल्या गावातील पंचांनी, पोलीसानी व महसूल प्रशासनाने कसा अन्याय केला हे सांगीतलं व मला न्याय पाहीजे अशी मागणी केली. याची जोरदार चर्चा आज जत शहर व तालुक्यात सुरू होती.