बीजिंग / वृत्तसंस्था
चीनचा विरोध डावलून तैवानला भेट दिल्यामुळे चीनने अमेरिकेच्या कनिष्ठ प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घोषित केला आहे. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तीनच दिवसांपूर्वी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला होता. त्या दौऱयात त्यांनी तैवानच्या पाठीशी अमेरिका असल्याचे वक्तव्य केले.
तैवानला भेट देणाऱया पेलोसी या गेल्या 25 वर्षांमधील अमेरिकेच्या प्रथमच उच्चपदस्थ नेत्या आहेत. त्यांच्या या भेटीला चीनने प्रारंभापासूनच विरोध केला होता. आगीशी खेळू नका, अन्यथा जळून जाल असा जळजळीत इशाराही चीनने अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांना दिला होता. परिणामी, हा दौरा होईल की नाही अशी शंका प्रारंभी वाटली होती. तथापि, हा दौरा झाला होता.
अमेरिकेची ही वर्तणूक ‘प्रक्षोभक’ असल्याचा आरोप चीनने त्याच्या सरकारी मुखपत्रातून केला होता. चीनच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला कोणीही धक्का पोहचविण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल. असा प्रयत्न करणाऱयाला पश्चात्ताप झाल्याखेरीज राहणार नाही, अशी भाषा चीनने केली होती. तसेच दौऱयानंतर तैवानच्या अवतीभोवती जोरदार युद्धसराव करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. या सरावात काही क्षेपणास्त्रे ‘चुकून’ जपानच्याही क्षेत्रात पडली होती. आता पेलोसी यांच्यावर निर्बंध घालून चीनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, या निर्बंधांचे नेमके स्वरुप कोणते हे स्पष्ट केलेले नाही.