आमदार पी. एन. पाटील यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
देशात निर्माण झालेली हुकूमशाही, वाढती बेरोजगारी व वाढती महागाई यांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (शुक्रवारी) सकाळी 9 वाजता करवीर विधानसभा मतदारसंघातील कांडगाव ते हळदी दरम्यान आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे. या पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते ,भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील – सडोलीकर यांनी दिली.
काँग्रेस पक्षातर्फे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार देशातील प्रत्येक जिह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे.
महाराष्ट्रामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, राज्य विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे,आमदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाढती महागाई हुकुमशाही व बेरोजगारी यांच्या विरोधात आझादी गौरव पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कांडगाव येथून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदयात्रेची सुरूवात होणार असून हळदी येथे समारोप करण्यात येणार आहे. या पदयात्रेमध्ये कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.