वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील हांगझू येथे होणारी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा कोरोनाच्या कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आली होती. ती आता पुढील वर्षी 22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावर्षी 9 ते 15 ऑक्टोबर या अवधीत ही स्पर्धा नियोजित करण्यात आली होती. पण चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे लक्षात घेत गेल्या मेमध्ये ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला. ही स्पर्धा आता पुढील वर्षी हांगझू येथेच घेण्यात येणार असल्याचे आशियाई पॅरालिम्पिक समिती (एपीसी) व आयोजन समितीने सांगितले. एचएपीजीओसी, चीनची राष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती व एपीसी यांच्यात चर्चा झाल्यानंतर नव्या तारखा निश्चित करण्यात आल्या.
आशियाई ऑलिम्पिक कौन्सिलने (ओसीए) गेल्या जुलैमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर केल्या, त्यानुसार ही स्पर्धा पुढील वर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. चीनमध्ये आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2010 मध्ये चीनमध्ये गुआंगझू येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.