जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली विकसित
प्रतिनिधी/कोल्हापूर
राष्ट्रीय पातळीवरील नामांकित ‘स्कॉच’ या संस्थेकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली’(पीडीएस) ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही प्रणाली विकसित केली आहे. आपत्तीच्या काळात याचा फार मोठा उपयोग झाला आहे.
कोल्हापूरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सन 2021 मध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत जिह्यात राबविण्यात आलेल्या सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली राबविण्यात आली. हा अभिनव प्रकल्प राबविल्याबद्दल स्कॉच पुरस्काराने सन्मानित केले आहे. बुधवारी (दि.17)या संस्थेने आयोजित केलेल्या ऑनलाइन बैठकीत सिल्व्हर कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ हा पुरस्कार स्वीकारला. कोल्हापूर जिह्याच्या या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन 2021 मध्ये कोल्हापूर जिह्यात जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण प्रकल्प बाबी अंतर्गत या सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली प्रकल्पासाठी निधी प्राप्त झाला होता. त्या अंतर्गत जिह्यातील 615 ठिकाणी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने जिल्हास्तरावरून विभागीय स्तरावरून तालुका स्तरावरून तसेच मंडळ पातळीवरून ही प्रत्येक गाव पातळीवरती संपर्क साधता येणे शक्य झाला आहे. जिल्हास्तरावरून कोणत्याही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जनसामान्यांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचविणे, कोणत्याही आपत्ती संबंधातील सूचना नागरिकांना देणे, याचबरोबर शांतता कालावधीमध्ये शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांचे निकष आदी माहिती या यंत्रणेच्या मदतीने प्रत्येक गावामध्ये जनसामान्यांच्या कानापर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे.
हा प्रकल्प प्रशासकीय क्षेत्रातील अभिनव व नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून स्कॉच या नामांकित संस्थेकडे राष्ट्रीय पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेला होता. स्कॉच या संस्थेने साधारणपणे चार पाकळ्या वरती या प्रकल्पाची छाननी केली. त्यानंतर या पुरस्काराची घोषणा झाली.