धारगळ येथील जमीन बळकावल्याचा आरोप
प्रतिनिधी / पणजी
मांद्रे मतदारसंघाचे मगोचे आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात जमीन घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तक्रार दाखल केली आहे. सर्वे नंबर 481/0 धारगळ पेडणे येथील 1 लाख 48 हजार 800 चौरस मिटर जमिनीचे प्लाट करून बेकायदेशीररित्या विकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ही जमीन दोघांच्या मालकीची आहे. म्हापसा येथील 76 वर्षीय रवळू खलप हे त्या जमिनीचे सहमालक आहेत. तसेच जमिनीची वाटणीही झाली नव्हती.
जीत आरोलकर यांनी सहमालकाला विश्वासात न घेताच परस्पर जमिनीचे सेलडीड करून जमिनीचा मालकी हक्क घेतला. नंतर त्या जमिनीचे प्लॉट करून त्यातील 200 प्लॉट विकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असून एसआयटीला हवे असल्यास ते आपण सादर करायला तयार आहे, असे ऍड. आयरीश रॉड्रीग्स यांनी एसआयटीला सांगितले आहे. रॉड्रिग्स यांनी जमीन मालकाच्या वतीने आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
एसआयटीचे प्रमुख अधीक्षक निधीन वालसन यांनी सांगितले या तक्रारीबाबत सखोल तपास करून नंतर तक्रार नोंद करायची की नाही ते ठरविले जाईल.