विसाव्या दिवशीही बिबटय़ा मोकाटच, वनविभागाचे 200 हून अधिक कर्मचारी मोहिमेत सहभागी
प्रतिनिधी /बेळगाव
वनविभाग, पोलीस तसेच मुधोळ श्वानांना बिबटय़ा शोधण्यात अपयश आल्यानंतर हत्तीच्या साहाय्याने बुधवारी शोधमोहीम राबविण्यात आली. रेसकोर्स परिसरात सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम करण्यात आली. त्यांच्या साथीला डुक्कर पकडणारे जाळय़ा घेऊन उभे होते. परंतु रात्री उशिरापर्यंत अर्जुन व आले या दोन हत्तींना बिबटय़ाचा शोध काही केल्या लावता आला नसल्याने ही मोहीमदेखील अपयशी ठरली.
बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी शिमोगा येथून मंगळवारी मध्यरात्री हत्ती बेळगावमध्ये दाखल झाले. अर्जुन व आले या दोन हत्तींवरून बुधवारी सकाळपासून शोध मोहीम राबविण्यात आली. शार्पशूटर्स, वनविभागाचे तज्ञ, कर्मचारी यांच्यासह काही जणांनी शोध मोहिमेमध्ये भाग घेतला होता. वनविभागाचे 200 हून अधिक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. हिंडलगा रोड, अरगन तलाव, क्लबरोड, रेसकोर्स रोड, जाधवनगर या परिसरात वनविभागाचे कर्मचारी व पोलीस तैनात करण्यात आले होते.
जाधवनगर येथील नाला केला बंद
रेसकोर्स परिसरात जमा होणारे पाणी जाधवनगर येथे येते. जाधवनगर येथील मुख्य मार्गावर हा नाला असून रेसकोर्समधून येणारे पाणी जाधवनगरमध्ये जाते.
त्यामुळे रेसकोर्स येथून बिबटय़ा जाधवनगर भागात येऊ नये या उद्देशाने हा नाला बंद करण्यात आला. वनविभागाच्या सूचनेनुसार नाल्यावर लाकडी पट्टय़ा मारून नाला बंद करण्यात आला. काहीनींतर याच नाल्यातून बिबटय़ा जाधवनगर परिसरात शिरला असावा, असा संशय व्यक्त केला.
दुकाने व रस्ते बंद
बुधवारी सकाळी हत्तींच्या मार्फत शोधमोहीम सुरू करण्यात आली. रेसकोर्सच्या एका बाजूने हत्ती शोधमोहीम राबवत असल्याने दुसऱया बाजूने बिबटय़ा बाहेर पडण्याची शक्मयता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जाधवनगर, इन्कमटॅक्स कार्यालयासमोरील परिसरातील दुकाने व रस्ते बंद करण्यात आले. रस्त्याशेजारी असणाऱया टपऱयांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱयांनी टपऱया बंद करण्यास सांगितले. जाधवनगर येथील मुख्य मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांना इतर मार्गाने घरी पोहोचावे लागले.
डुक्कर पकडणाऱयांचा संघ दाखल
रेसकोर्स परिसरात असणाऱया बिबटय़ाला पकडण्यात वनविभागाला अपयश आल्याने बुधवारी सकाळी डुक्कर पकडणाऱयांची एक टीम बेळगावमध्ये दाखल झाली. वनमंत्री उमेश कत्ती यांच्या सूचनेप्रमाणे 70 ते 80 फूट जाळे घेऊन डुक्कर पकडणारे कामगार रेसकोर्स परिसरात दाखल झाले आहेत. हे सर्वजण शेतांमधील डुक्कर पकडण्यात तरबेज असल्याने त्यांना बिबटय़ाला पकडण्यासाठी पाचारण करण्यात आले. एकूण 12 जणांचा यामध्ये सहभाग असल्याचे दिसून आले.