व्हॅनमध्ये जगत आहेत आयुष्य
सर्वसाधारणपणे मुलांच्या जन्मानंतर वर्षभरापर्यंत त्यांना घराबाहेर अधिक फिरविणे टाळले जाते. त्यांना अधिकाधिक सुरक्षित वातावरणात ठेवले जाते. परंतु एक दांपत्य स्वतःच्या छोटय़ा मुलांना घरातील कम्फर्ट झोनमधून बाहेर काढत रानोमाळ भटकंती करत आहे. या दांपत्याने स्वतःहून अनोखी लाइफस्टाइल निवडली आहे.
39 वर्षीय इदा ब्रिटजेन आणि 40 वर्षीय एंड्री मुलांना प्रयोगात्मक जीवन देणाऱया पालकांमध्ये सामील आहेत. त्यांना 3 वर्षांची मुलगी नोआ अन् 3 वर्षांचा मुलगा ऑड आहे. मोठय़ा मुलीच्या जन्मावेळी ते एका घरात राहत होते, परंतु त्यानंतर त्यांनी सिट्रॉन रिले नावाची व्हॅन खरेदी केली आणि त्यात स्वतःच्या गरजेनुसार बदल केले आहेत. फर्निचर अन् अन्य फिटिंगनंतर त्यांचे चाकांवर धावणारे घर तयार झाले. मग त्यांनी स्वतःचे कुटुंब व्हॅनमध्ये हलविले आणि कायमस्वरुपी घर सोडून दिले.
इन्स्टाग्रामवर हॅप्पिलीफॅमिलीइनव्हॅन नावाने इदा स्वतःच्या अजब जीवनाशी निगडित घडामोडी शेअर करत असते. स्वतःच्या मुलांसोबत 2 वर्षांपर्यंत केवळ आणि केवळ प्रवास करत राहणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. याकरता त्यांनी विशेष नियोजन अन् मेहनतही केली होती.
या दांपत्याने रक्कम जमवून 2 वर्षांपर्यंत मुलांसोबत पूर्णवेळ घालविण्याची व्यवस्था केली. इदा आणि एंड्री या दोघांचाही या संयुक्त निर्णय होता. अशा स्थितीत त्यांच्यासाठी हे पाऊल उचलणे अधिकच सोपे ठरले. त्यांनी घर सोडले तेव्हा त्यांचा मुलगा ऑड केवळ 6 महिन्यांचा होता.
जुलै 2019 पासून ते केवळ आणि केवळ रस्त्यांवर किंवा रानोमाळ भटकत राहिले आहेत. छोटय़ाशा व्हॅनमध्ये कुटुंबासोबत जगणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते. या प्रवासात केवळ चांगल्याच आठवणी मिळाल्याचे या दांपत्याने म्हटले आहे. त्यांची मुले देखील आता पूर्णपणे कॅम्पिंगच्या जीवनास सरावले असून त्यांना तेच अधिक पसंत आहे. महामारीदम्यान त्यांना स्वतःची ट्रिप छोटी करावी लागली होती.