वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने शनिवारी गोकुळाम केरळ संघाची दिलगिरी व्यक्त केली आहे. गोकुळाम केरळ संघाचे मालक व्ही. सी. प्रवीण यांनी शनिवारी ही माहिती दिली.
मध्यंतरी फिफाने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर बंदी घातली होती. अकरा दिवसांच्या या बंदीच्या कालावधीमध्ये आगामी एएफसी महिलांच्या क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेतून गोकुळम केरळ महिला संघाला डच्चू देण्यात आला होता. या निर्णयामुळे गोकुळम केरळला लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. फुटबॉल फेडरेशनच्या अकार्यक्षमतेमुळे आपल्या क्लबला ही किंमत मोजावी लागली, असे प्रतिपादन या क्लबचे मालक व्ही. सी. प्रवीण यांनी केले.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवरील फिफाने घातलेल्या बंदीमुळे कोझीकोडेच्या गोकुळम केरळ महिला फुटबॉल संघावर विपरित परिणाम झाला. गोकुळम केरळ महिला फुटबॉल संघ हा भारतीय महिला लीग चॅम्पियन्स विद्यमान विजेता आहे. फुटबॉल फेडरेशनच्या अकार्यक्षम प्रक्रियेमुळे गोकुळम केरळला लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले, असे प्रवीण यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. फिफाकडून अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवरील बंदी उठवण्यात आलेल्या निर्णयानंतर काही तासांमध्येच व्ही. सी. प्रवीण यांनी वृत्तसंस्थेशी संपर्क साधून आपले स्पष्टीकरण दिले. आशिया खंडातील गोकुळम केरळ महिला संघ हा एक सर्वोत्तम असून 2021 साली झालेल्या एएफसी महिला क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत या संघाने तिसरे स्थान मिळविले होते. गोकुळम केरळ महिला फुटबॉल संघाचे 16 ऑगस्ट रोजी भारतात आगमन झाले. त्यानंतर गोकुळम केरळचा 23 जणांचा संघ ताश्कंदला रवाना झाला होता. एएफसी महिलांच्या क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत गोकुळम केरळचा पहिला सामना 23 ऑगस्टला तर दुसरा सामना 26 ऑगस्टला खेळविला जाणार होता. पण, या स्पर्धेतून गोकुळाम केरळला काढून टाकण्यात आल्याने या संघातील खेळाडूंच्या हवाई प्रवासावर केलेला खर्च एएफसीने द्यावा, असे पत्र या क्लबचे मालक व्ही. सी. प्रवीण यांनी पाठवले आहे.