सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मंडप घालण्याच्या कामात व्यस्त : मंडप परिसरात राबविली स्वच्छता मोहीम
वार्ताहर /किणये
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. साऱयांनाच गणरायाच्या आगमनाची चाहूल लागून राहिली आहे. शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू आहे. नागरिक बेळगावहून विविध प्रकारच्या साहित्याची खरेदी करताना दिसत आहेत. तसेच सार्वजनिक युवक मंडळाचे कार्यकर्ते मंडप उभारणीच्या कामात व्यस्त असतानाचे चित्र दिसत आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे तालुक्मयात गेली दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला होता. काही मंडळांनी तर मंडपही छोटय़ा प्रमाणातच उभा केला होता. यंदा मात्र कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे सार्व. गणेशोत्सव मोठय़ा दिमाखात साजरा करण्यासाठी कार्यकर्ते धडपड करत आहेत.
शनिवार-रविवार तयारी जोमाने
गेल्या दहा-बारा दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडपाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. शनिवार व रविवार हे शाळकरी मुलांना तसेच कामगार वर्गाला सुटीचे दिवस असल्यामुळे व बुधवारी गणेश चतुर्थी असल्याने मंडप सजावटीचे काम शनिवारी व रविवारी जोमाने सुरू होते.
श्रमदानातूनच मंडप उभारणी
ग्रामीण भागातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे स्वतः श्रमदानातूनच मंडप उभारणी करतात. तर काही मोठे सार्वजनिक मंडळ असलेल्या गावांमध्ये मात्र मंडपासाठी कंत्राट देतात. पण बहुतांशी गावामध्ये तरुण कार्यकर्ते स्वतःच मंडप उभारणी करतात. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच गावागावांमध्ये या मंडपासाठीचा मुहूर्तमेढ कार्यक्रम झाला आहे. मिळेल त्या वेळेनुसार कार्यकर्ते मंडप उभारणीसाठी काम करत आहेत. शनिवारी आणि रविवारी मात्र मंडप उभारणीचे निम्म्याहून अधिक कामकाज पूर्ण करण्यासाठी तरुण कार्यकर्ते धडपडताना दिसत होते. तसेच मंडप परिसराची साफसफाईसुद्धा रविवारी कार्यकर्त्यांनी केली आहे.
ग्रामीण भागातही हलते देखावे
ग्रामीण भागातही अलीकडे हलते देखावे सादर करण्यात येत आहेत. काही गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पंढरपूरच्या वारीचे दर्शन, भारतीय लष्करी जवानांचे हलके देखावे, त्याचबरोबर ग्रामीण संस्कृती सादर करणारे देखावे करण्यात येत आहेत. काही गावांमध्ये पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देणारे देखावे सादर करण्यात येत आहेत.
गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज
ग्रामीण भागात बहुतांशी प्रमाणात लोक वर्गणीतून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांकडून वर्गणी जमा करण्याचे कार्य करत आहेत. भक्तमंडळी ही आपल्याला जमेल त्याप्रमाणे देणगी देत आहेत.
एकंदरीत तालुका गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून यंदाचा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.