दारिद्रय़ आणि नैराश्यावर मात करून समाजाचा आधार बनलेल्या दीप्ती नामक महिलेची ही अनुकरणीय कहाणी आहे. त्यांना बालपणापासून पोट भरण्यासाठी छोटे मोठी कामे करावी लागली. वडील व्यसनी असल्याने घरात नेहमी तणावग्रस्त वातावरण असे. तथापि, आईचा शिक्षणावर दांडगा विश्वास होता. दीप्ती या त्यांच्या तीन बहिणींमधील सर्वात छोटय़ा होत्या. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच आपले पोट आपण भरण्याच्या दृष्टीने त्यांना कामे करावी लागली होती.
बालपणातून तारुण्यात प्रवेश करताना कित्येकदा निराश होण्याचे प्रसंग आले. अत्यंत हलाखीत दिवस कंठावे लागले. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही. परिस्थितीवर मात करण्याचे आव्हान स्वीकारले. कुटुंबामध्ये केवळ आईचा त्यांना आधार होता. आईनेही कष्ट करून त्यांना शक्मय तितके शिकविले. आता त्यांनी ‘विमेन एनर्जी’ नामक संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यांना ज्या परिस्थितीतून जावे लागले, तशा अवस्थेतील महिलांना आधार देण्याचे काम ही संस्था करते. ही कंपनी त्यांनी त्यांचे हितचिंतक आणि वर्गातील मित्र-मैत्रिणींसमवेत स्थापन केली. त्याआधी त्यांना पदवी प्राप्त केल्यानंतर खतनिर्मिती करणाऱया कंपनीत 40 हजार रुपये वेतनाची नोकरी मिळाली होती. तथापि, पर्यावरण प्रदूषित करणाऱया अशा उद्योगात काम करण्याचे त्यांनी नाकारले. त्याऐवजी समाजाची चिंता वाहणाऱया कंपनीची स्थापना करणे त्यांना अधिक आवश्यक वाटले.
आज गेल्या पाच वर्षात 40 हजार महिलांना या संस्थेचा लाभ झाला आहे. संस्थेत महिलांना कौशल्य विकासासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. आपली शिदोरी सन्मानाने मिळविता यावी, यासाठी त्यांच्यातील गुणांचा विकास करण्याचे काम ही संस्था करते. त्यामुळे कुटुंबातील इतर कमावत्या व्यक्तींवर अवलंबून असणाऱया आणि अपमानास्पद वर्तणूक सहन करणाऱया महिलांचा आधारस्तंभ म्हणून ही संस्था आता सर्व परिचित झाली आहे. येत्या पाच वर्षात आणखी एक लाख महिलांना स्वयंरोजगार देण्याचे त्यांचे ध्येय आहे.