मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : गोवा पोलिसांनी केले चांगले तपासकाम,अनेक महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
प्रतिनिधी/पणजी
भाजपनेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट खूनप्रकरण सीबीआयकडे देण्यात आले असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी केली. या प्रकरणात गोवा पोलिसांनी चांगले तपासकाम केले असून महत्वाचे धागेदोरे त्यांच्या हाती लागले आहेत. हरियाणातील जनता आणि सोनाली फोगट यांच्या मुलीची मागणी लक्षात घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासाठी केंद्रीय गृह खात्याकडे देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
पणजीत काल सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. सोनाली फोगट खून प्रकरणाला 20 दिवस होत आले आहेत.
हणजूण पोलिसांनी अमलीपदार्थ विरोधी गुन्हा आणि सोनाली फोगट यांचा खून प्रकरण असे दोन गुन्हे नोंद केले आहेत. खून प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे तर अमलीपदार्थ प्रकरणात तीन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी सोनाली फोगट यांच्या हरियाणातील हिस्सार येथील घरी भेट देऊन काही महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. फोगट यांच्या खाजगी सहा डायऱया जप्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या जबान्या नोंद केल्या आहेत.
सुरुवातीला गोवा पोलिसांनी सोनाली मृत्यू प्रकरण हे अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते. शवचिकित्सा झाल्यानंतर त्यात 302 कलम जोडून खून प्रकरण म्हणून नोंद केले आणि त्यादृष्टीने तपासकाम सुरु केले.
खुनामागचा हेतू होत नव्हता स्पष्ट
सोनाली फोगट यांची मुलगी तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांनी हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी मागणी केली होती. गोवा पोलिसांनी या प्रकरणाचे तपासकाम केले असले तरी खून करण्यामागचा संशयितांचा नक्की हेतू काय ते अद्याप स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे सोनाली फोगट यांचा नियोजनबद्द खून करण्यात आला हे स्पष्ट होणे कठीण होत होते.
तपासकाम रखडल्याने प्रश्नचिन्ह
गेल्या 20 दिवसांपासून प्रकरण रखडत असल्याने सोनाली फोगट यांच्या नातेवाईकांनी तसेच त्यांच्या मुलीने गोवा पोलिसांच्या तपासकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि हे प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या मागणीवर जोर दिला होता. अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे मान्य केले.
सोनाली फोगट खूनप्रकरणाचा घटनाक्रम
- सोमवार 22 ऑगस्ट रोजी सोनाली फोगट मित्रांसह हणजुणेत आल्या आणि त्याच रात्री पार्टीला गेल्या.
- मंगळवार 23 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. हणजूण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली. मात्र नातेवाईकांनी त्यांचा खून झाल्याचा दावा केला.
- गुरुवार 25 ऑगस्ट रोजी डॉक्टरांच्या विशेष पथकाने शवचिकित्सा केली. शवचिकित्सेत काही संशयास्पद आढळून आल्यामुळे खून प्रकरण म्हणून नोंद करण्यात आली.
- शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी फोगट यांचे निजी सचिव सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांना अटक करण्यात आली.
- शनिवार 27 ऑगस्ट रोजी सोनाली यांचे नातेवाईक हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना भेटून प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली.
- रविवार 28 ऑगस्ट रोजी खट्टर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन खून प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली.
- मंगळवार 30 ऑगस्ट रोजी गोवा सरकारने खट्टर यांना तपासकामाचा अहवाल पाठविला.
- रविवार 11 सप्टेंबर रोजी हरियाणातील खाप महापंचायतीने विशेष सभा घेऊन हे खून प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली. अन्यथा 16 सप्टेंबर रोजी गोवा सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला.
- सोमवार 12 सप्टेंबर रोजी खून प्रकरण सीबीआयडे देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.