जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सेन्सेक्स-निफ्टी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील अंतिम दिवशीच्या सत्रात दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचा निर्देशांक घसरणीसोबत बंद झाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील घडामोडींच्या परिणामामुळे देशातील बाजार नुकसानीत राहिला आहे. सदरच्या प्रभावात सेन्सेक्स तब्बल 1,093 अंकांनी कोसळला असल्याचे दिसून आले.
जगभरात आता पुन्हा आर्थिक मंदीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करत असल्यामुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारच्या सत्रात मोठय़ा प्रमाणात विक्री केल्याचा परिणाम हा देशातील शेअर बाजारातील प्रवासावर झाल्याचे दिसून आले.
सेन्सेक्समध्ये सलगची तिसरी घसरण राहिली आहे. यामध्ये दिवअखेर शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स 1,093.22 अंकांनी प्रभवीत होत 1.82 टक्क्यांच्या नुकसानीसह निर्देशांक 58.840.79 वर बंद तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 346.55 अंकांनी प्रभावीत होत 1.94 टक्क्यांच्या घसरणीसोबत निर्देशांक 17,530.85 वर बंद झाला. सेन्सेक्समधील समभागांमध्ये टेक महिंद्रा आणि अल्ट्राटेक सिमेंटमध्ये सर्वाधिक म्हणजे चार-चार टक्क्यांपेक्षा अधिकने घसरण राहिली. यासोबतच इन्फोसिस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, विप्रो, टीसीएस, नेस्ले आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नुकसानीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये फक्त इंडसइंड बँकेचे समभाग नफा कमाईसोबत बंद झाले आहेत. आशियातील अन्य कंपन्यांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे घसरणीसह बंद झाले. तर युरोपमधील जास्तीत जास्त बाजार हे घसरणीसोबत ट्रेडिंग करत होते. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.32 टक्क्यांच्या वृद्धीसोबत 91.13 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थाच्या गुंतवणूकदारांनी जवळपास 1,270.68 कोटी रुपयाचे समभाग विक्री केली आहे.