जिल्हा बँकेच्या पोटनियम दुरुस्तीतून शह, काटशहचे राजकारण
कोल्हापूर /कृष्णात चौगले
जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत संचालक संख्या वाढविण्यासाठी केलेल्या पोटनियम दुरुस्तीवरून पुन्हा एकदा राजकीय संघर्षाला धार आली आहे. कृषी, पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया गटातील बँकेचे संचालक खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या एकीची ताकद दुभंगण्यासाठी प्रक्रिया गटाची फोड केली असल्याचा आरोप होत असला तरी त्यामागे आगामी राजकीय संदर्भ दडले आहेत. नेत्यांनी एकमेकांच्या राजकीय सोयीसाठी आणि विरोधकांचे उट्टे काढण्यासाठीच पोटनियम दुरुस्ती केली असल्याची चर्चा आहे. प्रथमदर्शनी हे बँकेचे राजकारण असले तरी त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसह अन्य राजकीय वाटचाली बीजे रोवली गेली आहेत.
शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱया जिल्हा बँकेची निवडणूक पक्षीय ऐवजी गटातटाच्या पातळीवर झाली. अन्य राखीव जागांसाठी खासदार संजय मंडलिक यांनी विरोधात मोट बांधली आणि त्यांना यश देखील मिळाले. बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य, शिवसेना (सध्याचा शिंदे गट), भाजप असे सर्वपक्षीय संचालक आहेत. निवडणुकीनंतर राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून गेले वर्षभर कारभार सुरु होता. पण एका नेत्याच्या हट्टासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत विरोध झालेला पोटनियम दुरुस्तीचा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर केल्यामुळे यापुढील काळात बँकेत कुरघोडीचे राजकारण पहावयास मिळणार आहे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून बँकेचे कामकाज सुरु होते. पण काही प्रमुख नेतेमंडळींनी बँकेच्या गतवर्षी झालेल्या निवडणुकीत आपल्या विरोधात जाऊन यशस्वी झालेल्या संचालकांचे उट्टे काढण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया संस्था गटाची फोड केल्याचा आरोप संचालक बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. तसेच वाढीव संचालकांच्या निर्णय घेऊन सत्ताधारी नेत्यांनी आपली बाजू सेफ करून विरोधी संचालकांना ते कसे गैरसोयीचे ठरेल याची खबरदारी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पन्हाळा-शाहूवाडीतील राजकारणाचा वास
जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे व संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. या वादातूनच आमदार कोरे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या उमदेवारीला विरोध केला. त्यामुळे विरोधी मोट बांधलेल्या खासदार मंडलिक, पाटील व अर्जुन आबिटकर यांनी विजयी गुलाल लावून कोरे यांच्यासह अन्य सत्ताधारी नेत्यांना शह दिला. याचा गांभिर्याने विचार करून बँकेच्या आगामी राजकीय वाटचालीत बाबासाहेब पाटील यांना कशा पद्धतीने अडथळा निर्माण होईल याचे पोटनियम दुरुस्तीतून नियोजन केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कागलच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता
शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले खासदार संजय मंडलिक व आम्ही जिह्याच्या राजकारणात एकत्र असल्याचे जिह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेळोवेळी सांगितले जाते. कागल विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटनामध्येही भविष्यात मी आणि आमदार मुश्रीफ एकत्रच असल्याचे खासदार मंडलिक यांनीही अनेकदा सांगितले आहे. पण त्यांचे चिरंजीव विरेंद्र मंडलिक यांचा गोकुळमधील पराभव आणि जिल्हा बँकेच्या पोटनियमातील दुरुस्तीमुळे झालेली गैरसोय यामुळे खासदार मंडलिक कोणती भूमिका घेतात याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. सद्यस्थितीत राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती असून आगामी निवडणुकांमध्येही हाच फॉर्म्युला कायम राहील. त्यामुळे कागलच्या विधानसभेच्या मैदानात खासदार मंडलिक भाजपचे उमेदवार समरजीत घाटगे यांना पाठबळ देणार की युती धर्माला छेद देऊन आमदार मुश्रीफ यांची पाठराखण करणार यावर कागलच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.