मालोजीराजे एआयएफएफच्या फायनान्स समितीच्या उपाध्यक्षपदी; मधुरिमाराजे यांची महिला समिती सदस्यपदी फेरनिवड
कोल्हापूर प्रतिनिधी
नवी दिल्लीतील अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी पंधराच दिवसापूर्वी निवडले गेलेले केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांना फेडरेशनच्याच नव्या तीन महत्वाच्या समित्यांमध्ये स्थान मिळाले आहे. फेडरेशनची आर्थिक वाहिनी असलेल्या फायनान्स समितीच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली. सोबत फेडरेशनच्यादृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धा समीतीवरही संधी देत त्यांना सदस्य म्हणून निवडले. इतकेच नव्हे तर भारतात होत असलेल्या जागतिक 17 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धाअंतर्गत महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी फेडरेशनचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून मालोजीराजे यांची निवड केली.
कोलकाता येथे फेडरेशनच्या कार्यकारिणी मंडळाच्या झालेल्या सभेत अध्यक्ष कल्याण चोबे यांनी मालोजीराजे यांचा सन्मान राखत त्यांच्या निवडीची घोषणा केली. याच सभेत मालोजीराजे यांच्या पत्नी आणि केएसएच्या पेट्रन मधुरिमाराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र फुटबॉल क्षेत्रात घेतलेल्या पुढाकाराची फेडरेशनने दखल घेतली आहे. त्यामुळे फेडरेशनच्या महिला समिती सदस्यपदी त्यांची फेरनिवड करताना त्यांनी महिलांमधील फुटबॉलवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान केला आहे. फेडरेशनच्या महत्वांच्या समित्यांवर मालोजीराजे व मधुरिमाराजे या दांपत्याला स्थान मिळाल्याची वार्ता कळताच कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव केला. त्यांच्या निवडीसाठी केएसएचे केएसएचे पेट्रन-इन्-चीफ श्रीमंत शाहू छत्रपती व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.