डिचोली पोलिसांची कारवाई. साखळी येथील प्रकार.
डिचोली/प्रतिनिधी
साखळी येथील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या “ओव्हरलुड्क” या क्रिडा सामान विक्री दुकानावर ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी या दुकानातील मोबाईल चोरल्याच्या प्रकरणी डिचोली पोलिसांना दोघांना अटक करून दोन्ही मोबाईल फोन जप्त केले. सदर दोन्ही सेमसंग कंपनीच्या मोबाईलची किंमत सुमारे 70 हजार आहे.
या प्रकरणी गोकुळवाडी साखळी येथील रत्नदीप दादासो सावंत यांनी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. गेल्या 15 सप्टें. रोजी विकी अशोक शेळके (वय 31, रा. तुपेनगर, मांजरी, हवेली कर्नाटक) व अरविंद सुरेश सळु?खे (वय 32, रा. सोनड, सोलापूर, महाराष्ट्र) हे दोघे रत्नदीप सावंत यांच्या ओव्हरलुड्क या दुकानात चोरीच्याच इराद्याने ग्राहन बनून आले आणि त्यांनी थेट सुमारे 70 हजार किंमतीचे दोन मोबाईल फोन चोरले.
हे प्रकरण लक्षात येत च सावंत यांनी आपल्या पध्दतीने सदर चोरटय़ांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि अखेर 16 रोजी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी तपासाला गती देत पोलीस उपअधिक्षक सागर एकोसकर व निरिक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र गावस यांनी पोलीस शिपाई आशिष नाईक व शैलेश फडते यांच्या मदतीने दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले.