नगरसेवक महेश आमोणकर यांची माहिती, नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांच्या विधानाचा निषेध
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचे भाजप नगरसेवक, ज्यांनी जांबावलीत देव दामोदराचे दर्शन घेतले ते सर्व जण आंघोळ करूनच आणि कोणताही मांसाहार न करता गेले होते. यासंदर्भात नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांनी जे विधान केले आहे त्याचा आपण निषेध करतो, असे त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी पुढाकार घेतलेले नगरसेवक महेश ?आमोणकर यांनी म्हटले आहे. मडगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निषेध व्यक्त केला.
श्री दामोदर हे आमचे ग्रामदैवत असून आम्हाला मंदिरात जाताना कसे पावित्र्य जपावे याची माहिती आहे. आमच्यातील एका सारस्वत नगरसेवकाने, जे मंदिराचे महाजन आहेत, आम्हाला आंघोळ करूनच देवाचे दर्शन घेण्याची आठवण या भेटीच्या आधी करून दिली होती, असे आमोणकर यांनी सांगितले. आमच्यातील कोणीच मद्यपान केले नव्हते. परंतु कोण किती आणि कसे तासन्तास मद्यपान करतात हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी उगाच दुसऱयांवर आरोप करू नयेत, असे ते म्हणाले.
जे नगरसेवक जांबावलीत गेले होते त्यातील 5 जणांनी घनश्याम शिरोडकर यांना क्रॉस व्होटिंग केले होते आणि याचे भान त्यांनी ठेचायला हवे होते. आता हे 5 नगरसेवक त्यांना जाब विचारू शकत नाहीत. कारण तसे केले, तर हे नगरसेवक उघडे पडतील व त्यांनी क्रॉस व्होटिंग केले होते हे उजेडात येईल, असे आमोणकर यांनी नजरेस आणून दिले. गोव्यातील कित्येक ख्रिस्तीधर्मीय दामबाबाला मानतात. आमच्या ख्रिस्ती नगरसेवकांनी आपणहून देव दामोदरासमोर प्रमाण केले. त्यांच्यावर कोणी दबाव आणला नव्हता. परंतु तेही अशा आरोपांनी दुखावून गेले असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.
नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर हे आयत्या बिळात नागोबा बनू पाहत आहेत. ते स्वतःला स्वतंत्र नगरसेवक म्हणत असले, तरी आमदार दिगंबर कामत यांच्या मॉडेल मडगाव पॅनलमधून ते जिंकून आले होते. त्यांच्यात दम असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन आता जिंकून येऊन दाखवावे. त्यांनी तसे केल्यास मी त्यांच्यामागे राहणार, असे आव्हान आमोणकर यांनी दिले. यापूर्वी घनश्याम शिरोडकर यांच्यासोबत काही नगरसेवकांनी शिर्डी वारी केली होती. त्यावेळच्या व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये नारळ कोणाच्या हातात होता ते घनश्याम यांनी सांगावे. उगाच वैफल्यग्रस्त होऊन दिशाहीन वक्तव्ये करू नयेत, असे आमोणकर पुढे म्हणाले.