महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
कूळ-मुंडकार प्रकरणे निकालात काढण्यासाठी प्रत्येक तालुक्यात संयुक्त मामलेदारांची खास नेमणूक करण्यात येणार असून त्याकरीता प्रक्रिया चालू केल्याची माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली आहे.
या संदर्भातील फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली असून त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा मोन्सेरात यांनी वर्तविली. अनेक तालुक्यात संयुक्त मामलेदार नसल्याने ही प्रकरणे प्रलंबित असून त्यांचे निकाल लागत नाहीत. त्यामुळे संबंधित लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्याची गंभीर दखल घेऊन आता एका वर्षात ती सर्व प्रकरणे सोडवण्यासाठी सरकारने देखील कंबर कसल्याचे त्यांनी नमूद केले.
कूळ-मुंडकार प्रकरणे संपवण्यासाठी राज्य सरकारने एक खास आदेश जारी केला असून त्यात एका वर्षात त्यांचा निकाल लावण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात खास संयुक्त मामलेदार नेमण्यात येणार असल्याचे मोन्सेरात म्हणाले. सध्या प्रत्येक तालुक्यात संयुक्त मामलेदार कमी आहेत. कामाचा बोजा जास्त आहे. त्यावर मात करण्यासाठी हे मामलेदार नेमण्यात येणार असून ती कूळ-मुंडकार प्रकरणे तातडीने निकालात काढतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी गरज पडली तर शनिवारी देखील काम करण्याची तयारी सरकारने केल्याचे मोन्सेरात यांनी नमूद केले.