वृत्तसंस्था/ चेन्नई
शार्दुल ठाकुर आणि रजत पाटीदार यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी येथील चेपॉक मैदानावर झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात भारत ‘अ’ ने न्यूझीलंड ‘अ’ संघाचा 7 गडय़ांनी पराभव करत या मालिकेत विजयी सलामी दिली. शार्दुल ठाकुरने 32 धावांत 4 तर रजत पाटीदारने 41 चेंडूत नाबाद 45 धावा जमविल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड ‘अ’ संघाचा डाव 40.2 षटकात 167 धावांत आटोपला. त्यानंतर भारत ‘अ’ ने 31.5 षटकात 3 बाद 170 धावा जमवित विजय नोंदविला.
न्यूझीलंड ‘अ’ संघाच्या डावामध्ये मिचेल रिपॉनने 4 चौकारांसह 61 तर वॉकरने 36 धावा जमविल्या. या जोडीने नवव्या गडय़ासाठी 89 धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंड ‘अ’ संघाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. डावातील 39 व्या षटकात वॉकर धावचीत झाला तर शार्दुल ठाकुरने रिपॉनला झेलबाद केले. या सामन्यात शार्दुल ठाकुरची गोलंदाजी अधिक भेदक आणि अचूक ठरली. ठाकुरला कुलदीप सेनची साथ मिळाली. या दोघांच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंड ‘अ’ संघाची एकवेळ स्थिती 7.3 षटकात 5 बाद 27 अशी केविलवाणी झाली होती. 19 व्या षटकाअखेर न्यूझीलंड ‘अ’ ने 8 बाद 74 धावांपर्यंत मजल मारली होती. कुलदीप सेनने 30 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत ‘अ’ संघाच्या डावामध्ये ऋतुराज गायकवाडने 41 तर रजत पाटीदारने नाबाद 45 आणि राहुल त्रिपाठीने 31 तसेच कर्णधार संजू सॅमसनने 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 29 धावा जमविल्या. पृथ्वी शॉ 17 धावांवर बाद झाला. ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसऱया गडय़ासाठी 56 धावांची भागीदारी केली. ऋतुराज आणि त्रिपाठी हे पाठोपाठ बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि रजत पाटीदार यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करताना चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 69 धावांची भागीदारी केली. पाटीदारने 7 चौकारांसह नाबाद 45 धावा झळकविल्या.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड ‘अ’ 40.2 षटकात सर्वबाद 167 (रिपॉन 61, वॉकर 36, बोवेस 10, शार्दुल ठाकुर 4-32, कुलदीप सेन 3-30), भारत ‘अ’ 31.5 षटकात 3 बाद 170 (पाटीदार नाबाद 45, ऋतुराज गायकवाड 41, राहुल त्रिपाठी 31, पृथ्वी शॉ 17, संजू सॅमसन नाबाद 29).