सहाय्यक कामगार आयुक्तांच्या आश्वासनानंतर निर्णय
कोल्हापूर प्रतिनिधी
बांधकाम कामगारांची प्रलंबित कामे पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेतर्फे आज, मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु याची दखल घेत नुतणीकरण, अपडेट केलेले अर्ज तपासणीचे काम सुरू केले आहे, तसेच उर्वरित सर्व प्रलंबित कामे शुक्रवार (दि.3)पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी सोमवारी दिले. त्यामुळे हे आंदोलन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे व जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना दि 15 सप्टेंबरला नवीन नोंदणी, नुतणीकरण, लाभाचे अर्ज, आदी सर्व पेंडीग कामे पूर्ण करा, अन्यथा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आज, मंगळवारी (दि. 27) तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मागण्या अशा, ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये सबमिट केलेले बांधकाम कामगारांचे, ऑनलाईन नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे अर्ज गेले दोन महिने तपासलेले नाहीत. ते तात्काळ तपासून त्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्या तात्काळ अपडेट कराव्यात,ऑनलाइन नोंदणी, नुतणीकरण, तसेच लाभाच्या अर्जाचा तात्काळ निपटारा करावा, नुतणीकरणाच्या अर्जांची आठ दिवसाच्या आत तपासणी करावी, विनाकारण त्रुटी लावणार्या नोंदणी अधिकायांवर कारवाई करावी, लाभ मंजुरीचे संदेश येऊनही बहुतांशी कामगारांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा झाली नाही, तरी ती तात्काळ जमा करावी, घरकुल योजनेचे सर्वच अर्ज तात्काळ मंजुर करावेत.