गोळीबारात 2 चिनी नागरिक जखमी
वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानच्या कराचीमध्ये बुधवारी एका चिनी नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. बाजारपेठेत असलेल्या एका डेंटल क्लीनिकवर एका संशयिताने गोळीबार केला होता, यात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिनी नागरिकांना यापूर्वीही अनेकदा लक्ष्य करण्यात आले होते.
कराचीत गोळीबारात मारले गेलेल्या चिनी नागरिकाचे नाव रेमंड छोहू होते आणि तो डॉक्टर होता. तर गोळीबारात रिचर्ड छोहू अन् मारग्रेट हू हे चिनी नागरिक जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिंध प्राताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी विस्तृत अहवाल मागविला आहे. कराचीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाचारण करत मुख्यमंत्र्यांनी आरोपींना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
या गोळीबाराच्या घटनेमागे बलोच लिबरेशन आर्मी या संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. चिनी नागरिकांवरील हल्ल्यासाठी पाकिस्तान नेहमीच बीएलएला जबाबदार ठरवत आला आहे.
नोव्हेंबर 2018 मध्ये कराचीतील चीनच्या दूतावासावर हल्ला झाला होता. तर जून 2020 मध्ये कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्ल्याची जबाबादरी बीएलएने स्वीकारली होती. कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये चीनने मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्यात तीन सुरक्षारक्षक आणि एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला होता.