पुणे / प्रतिनिधी :
दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भाषणे एकाचवेळी सुरू झाली, तर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांचे, तर नंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकू, असे उत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी येथे दिले.
येत्या 5 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्याचे भाषण होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना दसरा मेळाव्याला एकाच वेळी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू झाले, तर तुम्ही कोणाचे भाषण ऐकणार? असा प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले, तसेही तुम्ही चॅनलवाले रिपीट करतच असता. हे तुमचे कामच आहे. त्यामुळे दुसरे चॅनेल लावायचे आणि दुसरे भाषण ऐकायचे त्यात काय? अर्धा तास पुढे मागे झाले, तरी बिघडले कुठे? असे हसतच उत्तर अजित पवारांनी दिले. मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आहे. दोन्हीही गट इतरांना त्रास होणार नाही आणि नियमांचे पालन करून मेळावा करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अधिक वाचा : गडकरींकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी
मी आता त्यांना पत्र पाठविणार आहे की टेनिंगसाठी केव्हा येऊ? त्या टेनिंगकरता काही फी लागणार आहे का? की ते मोफत दिले जाणार आहे? त्याबाबत मी त्यांच्याशी हितगुज करतो. त्यांच्याकडून टेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो, असा टोला पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
सत्तारांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे
आज बेरोजगारी, महागाईचा प्रश्न आहे. त्याला महत्त्व न देता, त्या विषयांवर चर्चा न होण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. बेरोजगारी वाढली, वेदान्तसारखा प्रकल्प गेला. दोन लाख तरुणांचा रोजगार गेला. त्याविषयी त्यांनी बोलावे. इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असा निशाणाही पवार यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला.