आव्हाने-अडचणी पेलण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर नवीन सीडीएस बनलेले लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. जनरल चौहान यांच्या पत्नी अनुपमा आणि त्यांचे वडील सुरेंद्र सिंह चौहान हेही सर्वोच्च पदाचा कार्यभार स्वीकारताना उपस्थित होते. भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च पदाची जबाबदारी स्वीकारताना मला अभिमान वाटतो. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या नात्याने मी तिन्ही संरक्षण दलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आम्ही सर्व आव्हाने आणि अडचणींना एकत्रितपणे सामोरे जाऊ, अशी ग्वाही पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दिली.
सीडीएसचा पदभार स्वीकारण्यापूर्वी जनरल चौहान यांनी इंडिया गेट संकुलातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे भारताच्या हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. रायसीना हिल्समधील साऊथ ब्लॉकच्या लॉनवर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल एस. एन. घोरमाडे यांच्या उपस्थितीत त्यांना त्रिस्तरीय गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
केंद्र सरकारने बुधवारी अनिल चौहान यांची नवीन सीडीएस म्हणून नियुक्ती जाहीर केली होती. त्यानंतर दोनच दिवसात ते आपल्या नव्या पदावर रुजू झाले आहेत. लष्करी अधिकारी अनिल चौहान मागील वषी पूर्व लष्करी कमांडर म्हणून निवृत्त झाल्यानंतर, ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून काम करत होते. फोर स्टार रँक ऑफिसर म्हणून पुन्हा महत्त्वाच्या पदावर सेवेत रुजू होणारे ते देशातील पहिले सेवानिवृत्त थ्री-स्टार रँकचे लष्करी अधिकारी ठरले आहेत. सीडीएस पदाबरोबरच ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर हे पद गेल्या 9 महिन्यांपासून रिक्त होते. अनिल चौहान हे ‘गोरखा रायफल्स’चे असून पहिले सीडीएस दिवंगत जनरल रावत हेसुद्धा त्याच युनिटचे होते. 18 मे 1961 रोजी जन्मलेले लेफ्टनंट जनरल अनिल चौहान 1981 मध्ये भारतीय लष्कराच्या 11 गोरखा रायफल्समध्ये दाखल झाले होते.
बालाकोट हवाई हल्ल्यातही सामील
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी 2019 मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यावेळीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हवाई हल्ल्यादरम्यान, ते लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केला होता. मेजर जनरलच्या पदावर त्यांनी उत्तर कमांडमधील महत्त्वाच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये इन्फंट्री (तोफखाना) विभागाचे नेतृत्व केले. त्यानंतर, लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्य भारतातील एका कॉर्प्सचे नेतृत्व केले होते. सप्टेंबर 2019 पासून मे 2021 मध्ये सैन्यातून निवृत्त होईपर्यंत ते पूर्व कमांडच्या ‘जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ’ या पदावर कार्यरत होते. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी यापूर्वी अंगोलातील संयुक्त राष्ट्र मिशनमध्येही काम केले आहे. 31 मे 2021 रोजी ते भारतीय लष्करातून निवृत्त झाले. लष्करातील त्यांच्या विशिष्ट आणि सर्वोत्तम सेवेबद्दल परमविशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.