रविवार 16 रोजी मतदान : तिन्ही ठिकाणी बहुरंगी लढती
प्रतिनिधी /पणजी
जिल्हा पंचायतीच्या 3 मतदारसंघासाठी येत्या 16 ऑक्टोबर रोजी होणाऱया पोटनिवडणुकीसाठी एकूण 16 उमेदवार अंतिम रिंगणात शिल्लक राहिले असून तिन्ही ठिकाणी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तर गोव्यातील रेईश मागूश मतदारसंघात 4 उमेदवार एकमेकांशी लढत देणार असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. या पोटनिवडणुका पक्षीय पातळीवर होणार असून रेईश मागूसमध्ये प्रगती संदीप पेडणेकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर भाजपतर्फे संदीप काशिनाथ बांदोडकर हे रिंगणात आहेत. त्याशिवाय राजेश वैपुंठ दाभोळकर आणि साईनाथ बाबलो कोरगावकर हे दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत.
दक्षिण गोव्यातील दवर्ली मतदारसंघातून 8 उमेदवार रिंगणात आहेत. लोन्सिओ फर्नांडिस रायकर हे तेथे काँग्रेसचे उमेदवार असून परेश पांडुरंग नाईक हे भाजपचे उमेदवार आहेत. आम आदमीतर्फे सिद्धेश संतोष भगत हे निवडणूक लढवत आहेत. त्या शिवाय 5 अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. त्यात ऍन्ड्रय़ु कायतान रिबेलो, भगवान रमेश रेडकर, जोस आग्नेलो डायस, मुर्तूझा करीम, मुब कुकनूर यांचा समावेश आहे.
कुठ्ठाळी या मतदारसंघात भाजपचा अधिकृत उमेदवार नाही. काँग्रेसतर्फे वालेंट बार्बोझा तर आपचे जॉन डिसा निवडणुकीत उतरले असून लेस्ले आग्नेलो गामा, मार्सियाना मेंडिस वाझ हे अपक्ष उमेदवार असून तेथे एकूण 4 उमेदवार रिंगणात आहेत.