वृत्तसंस्था/ पर्थ
यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जात आहे. रविवारी या मालिकेतील झालेल्या दिवस-रात्रीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 6 बाद 208 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 209 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 9 बाद 200 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 8 धावांनी गमवावा लागला.
इंग्लंडच्या डावाला कर्णधार बटलर आणि हॅलेस यांनी दमदार प्रारंभ करून दिला. या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 11.2 षटकात 132 धावांची भागीदारी केली. कर्णधार बटलरने 32 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारासह 68 तर हॅलेसने 51 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारासह 84 धावा झोडपल्या. स्टोक्स 1 चौकारासह 9 धावावर बाद झाला. ब्रुकने 2 चौकारासह 12, मोईन अलीने 1 षटकार 10 धावा केल्या. वोक्सने 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 13 धावा झळकविल्या. इंग्लंडच्या डावात 8 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे इलिस सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 20 धावात 3 तर रिचर्डसन, सॅम्स आणि स्टोईनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील दुसऱया षटकात सलामीचा ग्रीन टॉप्लेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने केवळ 1 धाव जमविली. अनुभवी वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी केली. रशीदने मार्शचा त्रिफळा उडविला. त्याने 26 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 36 धावा जमविल्या. कर्णधार फिंच एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 7 चेंडूत 1 षटकारासह 12 धावा केल्या. वॉर्नर आणि स्टोईनिस यांनी चौथ्या गडय़ासाठी 53 धावांची भर घातली. सलामीच्या वॉर्नरने 44 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारासह 73 धावा जमविल्या. वुडने त्याला झेलबाद केले. स्टोईनिसने 15 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 35 धावा जमविल्या. टिम डेव्हिडला आपले खाते उघडता आले नाही. मॅथ्यू वेडने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. सॅम्स 6 धावावर बाद झाला. इलिसला करनने खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचित केले. लिस बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 19.5 षटकात 9 बाद 198 धावापर्यंत मजल मारली होती. आणि त्यांना विजयासाठी आणखी नऊ धावांची जरुरी होती. 20 षटकात ऑस्ट्रेलियाने 9 बाद 200 धावापर्यंत मजल मारली. रिचर्डसन आणि स्वेप्सन हे नाबाद राहिले. इंग्लंडतर्फे मार्क वुडने 34 धावात 3, टॉप्लेने 36 धावात 2, सॅम करनने 35 धावात 2 आणि आदील रशीदने 41 धावात एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 20 षटकात 6 बाद 208 (बटलर 68, हॅलेस 84, ब्रुक 12, मोईन अली 10, ओक्स नाबाद 13, इलिस 3-20, रिचर्डसन, सॅम्स, स्टोईनिस प्रत्येकी एक बळी), ऑस्ट्रेलिया 20 षटकात 9 बाद 200 (वॉर्नर 73, मिचेल मार्श 36, फिंच 12, स्टोईनिस 35, वेड 21, मार्क वुड 3-34, टॉप्ले 2-36, सॅम करन 2-35, रशिद 1-41).