धनत्रयोदशीनिमित्त यमदीप दान
प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या आरोग्याची काळजी घेतात त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाते. धन्वंतरी म्हणजे देवतांचे वैद्य. त्यांची जयंती ही धनत्रयोदशी म्हणून साजरी केली जाते. याच अनुषंगाने शहरात शनिवारी वैद्य आणि डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यामध्ये धन्वंतरी पूजन केले.
धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांच्या समुद्र मंथनातून झाला. त्यांच्या एका हातामध्ये अमृत कलश, दुसऱया हातामध्ये जळू, तिसऱया हातामध्ये शंख आणि चौथ्या हातामध्ये चक्र होते. त्यांचा उपयोग करून धन्वंतरी रोगांना बरे करतात, असे म्हटले जाते. तसेच कोणाचाही अपमृत्यू होऊ नये यासाठी धनत्रयोदशीला सायंकाळी कणकीचा दिवा करून त्याची पूजा करण्यात आली. काही जणांनी यमदीप दान केले.
तसेच यादिवशी धनाचीही पूजा करण्यात येते. व्यापारी लोकांसाठी हा विशेष दिवस असून त्यांनी लक्ष्मीचे पूजन केले. या दिवसाचा संबंधही कृषी संस्कृतीशी जोडला गेला आहे. शेतामध्ये पिके डोलू लागतात आणि हे शेतकऱयांचे खरे धन आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाने पैसे एकत्र ठेवून त्याची पूजा केली. गूळ, धने यांची पूजा केली.