4 महिन्यांनी झाली भेट ः पंतप्रधान पदाच्या नामांकनासाठी दोघेही इच्छुक
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमधील राजकीय अस्थिरता अद्याप कायम असताना माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले ऋषी सुनक यांनी शनिवारी रात्री उशिरा चर्चा केली आहे. सुनक यांनी जुलै महिन्यात अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सुनक आणि जॉन्सन यांच्यात कटूता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर या दोघांनी पहिल्यांदाच चर्चा केली असल्याचे मानले जात आहे.
दोघांमधील बैठकीची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांच्या शिवाय कुणालाच देण्यात आली नव्हती. दोन्ही नेते पंतप्रधान पदासाठी इच्छुक असल्याने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. लिझ ट्रस सरकार कोसळल्यावर सुनक आणि जॉन्सन हे कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते आणि पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. परंतु दोघांनीही अद्याप अधिकृत स्वरुपात अर्ज भरलेला नाही. सुनक आणि जॉन्सन यांनी उमेदवारीवरूनच चर्चा केल्याचे मानले जात आहे.
दुसऱया क्रमांकाच्या पदाची ऑफर
कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीत अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र येत काम करण्यावर चर्चा केल्याचे समजते. तर माजी पंतप्रधान जॉन्सन यांनी सुनक यांना दुसऱया क्रमांकाच्या पदाची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. सुनक यांनी यापूर्वी अर्थमंत्री पद भूषविले असल्याने ते ही ऑफर स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील होणार आहेत.
सुनक आघाडीवर
28 ऑक्टोबर रोजी होणाऱया पक्षांतर्गत निवडणुकीत तीन खासदारांची नावे प्रमुख दावेदार म्हणून समोर आली आहेत. यातील सुनक यांना 128 खासदारांचा पाठिंबा प्राप्त आहे. तर जॉन्सन यांच्याकडे 53 आणि पेनी मोर्डंट यांना 23 खासदारांचे समर्थन आहे.
सुनक यांचे धोरण
ट्रस यांच्याशी झालेल्या मागील लढतीत सुनक यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या स्थायी सदस्यांच्या मतदानातून मोठा धडा घेतला आहे. सुनक यावेळी पंतप्रधानपदाची लढत पक्षसदस्यांच्या मतदानापर्यंत नेऊ इच्छित नाहीत. खासदारांच्या मतदानात मागीलवेळी सुनक ही आघाडीवर होते. पक्ष सदस्यांच्या मतदानात मात्र सुनक मागे पडले होते.