इंटरनेटअभावी रखडला प्रकल्प : तब्बल 181 कोटींचा खर्च
प्रतिनिधी /पणजी
राजधानी पणजीसह पर्वरी, ओल्ड गोवा, ताळगांव इत्यादी ठिकाणी कोटय़वधी खर्च करुन बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरा पुरेशी गती नसलेल्या इंटरनेटच्या अभावामुळे धुळ खात पडल्याचे समोर आले असून या प्रकल्पास सुमारे 3 वर्षे उशीर झाल्याचेही दिसून आले आहे. सरकारने फक्त सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाची घोषणाबाजी केली परंतु त्यासाठी आवश्यक असलेल्या पुरेशा इंटरनेटची सोय केली नसल्यामुळे त्या कॅमेरांचा सध्या तरी काहीच उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पणजी शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड झाल्यानंतर या सीसीटिव्ही कॅमेरा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले ते लार्सन अँड टुब्रो कंपनीला जून 2018 मध्ये देण्यात आले.
इंटरनेटअभावी रखडला प्रकल्प
कंपनीने कॅमेरा बसवण्याचे काम पूर्ण केले परंतु इंटरनेटच्या अभावी हा प्रकल्प कार्यवाहीत आणणे कंपनीला शक्य झाले नाही. सरकारने आणि कंपनीने इंटरनेटची सोय करण्याचे आश्वासन देवून प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अनेक तारखा दिल्या परंतु त्या वाया गेल्या असून 2022 साल संपत आले तरीही हा प्रकल्प इंटरनेट नसल्याने फक्त ‘शो’ बनला आहे.
नियंत्रण केंद्र वापराविना पडून
आल्तिनो-पणजी येथे सदर प्रकल्पाचे नियंत्रण केंद्रही कंपनीने स्थापन केले परंतु इंटरनेट नसल्याने ते केंद्र वापराविना आहे. माणसाचा चेहरा ओळखणे, वाहनासह नंबरप्लेट ओळखणे यासारखी अत्याधुनिक यंत्रणा त्या कॅमेरात बसवण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रण, वाहतूक नियमांचे उल्लंघन यावरही ते कॅमेरा लक्ष ठेवणार आहेत. परंतु त्याकरिता लागणारे इंटरनेट उपलब्ध नसल्याने सर्व काही सध्या तरी निरुपयोगी ठरले.
प्रकल्पासाठी तारीख पे तारीख
या प्रकल्पासाठी डिसेंबर 2019 अशी मुदत आणि महिना दिला होता. ती मुदत संपल्यानंतर डिसेंबर 2021 अशी दोन वर्षे वाढवून मुदत देण्यात आली ती संपली तरी देखील हा प्रकल्प सुरु झाला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ऑगस्ट 2022 अशी नव्याने मुदत सांगण्यात आली. ती देखील आता संपुष्टात आली असून हा प्रकल्प केव्हा कार्यान्वित होणार याचा सध्या कोणालाच पत्ता नसल्याचे दिसून येत आहे. सुमारे रु.181 केंटीचा हा प्रकल्प असून सध्या तरी त्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला नाही.
पणजी स्मार्ट सिटीचा प्रकल्प
पणजी स्मार्ट सिटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि. आणि एल अँड टी या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. इंटग्रेटेड कमांड आणि कंट्रोल असे त्या प्रकल्पाचे नाव असून राजधानी पणजीत विविध ठिकाणी तसेच पर्वरी, ताळगाव, ओल्ड – गोवा येथे सीसीटिव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत.
गोवा ब्रॉडबँड नेटवर्क (जीबीबीएन) आणि आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान खाते यांना इंटरनेट सुविधा देण्यासाठी वारंवार सांगण्यात आले, परंतु त्यात त्यांना अपयश आले असून सरकारच्या लाल फितीत हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी अडकला की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.