स्ट्रीट लाइट बंद करून दगडेफक ः वाहनांची जाळपोळ ः पेट्रोल बॉम्बने हल्ला
वृत्तसंस्था/ वडोदरा
गुजरातच्या वडोदरा शहरात दिवाळी सणादरम्यान सोमवारी रात्री सांप्रदायिक हिंसा झाली आहे. शहराच्या पानीघाट भागात रात्री उशिरा सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान दगडफेक झाली. समाजकंटकांनी वाहनांची जाळपोळ केली आहे. पोलीस तेथे पोहोचताच दंगलखोरांनी पोलीस अधिकाऱयांवर पेट्रोल बॉम्ब फेकले आहेत.
तर हिंसेपूर्वी दंगलखोरांनी परिसरातील स्ट्रीट लाइट बंद केली होती. मंगळवारी सकाळी पोलिसांनी 19 समाजकंटकांना अटक केली आहे. वाहनांची जाळपोळ करणाऱया लोकांची या भागातील सीसीटीव्हीच्या मदतीने ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सोमवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर पानीगेट मुस्लीम मेडिकल कॉलेजनजीक फटाके फोडण्यावरून वाद सुरू झाला होता. त्यानंतर एका गटाने स्ट्रीट लाइट बंद करून दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दंगलखोरांनी रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने आणि सामग्री पेटवून दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचताच दंगलखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. यादरम्यान पोलीस उपायुक्त यशपाल जगनिया यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. सुदैवाने या पेट्रोल बॉम्बचा स्फोट न झाल्याने ते बचावले आहेत. या घटनेनंतर संबंधित परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वडोदराचा पानीगेट भाग सांप्रदायिक स्वरुपात संवेदनशील मानला जातो. यापूर्वीही येथे अनेकवेळा दगडफेक तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.