व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) : एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इरेस्टी बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि हॉलंडच्या मॅटवे मिडलकुप या जोडीने दुहेरीत विजयी सलामी देताना अर्जेंटिनाच्या कॅचिन आणि शुवार्त्जमन यांचा पराभव केला.
या स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात बोपण्णा आणि मिडलकुप यांनी कॅचिन व शुवार्त्जमनचा 6-1, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. बोपण्णा आणि मिडलकुप या जोडीने या विजयामुळे नोव्हेंबर महिन्यात होणाऱया एटीपी टूरवरील फायनल स्पर्धेसाठी आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. एटीपीच्या दुहेरीच्या क्रमवारीत बोपण्णा आणि मिडलकुप 15 व्या स्थानावर आहे. दुसऱया एका सामन्यात गोंजालेज आणि मोलटेनी या जोडीने वेस्ले कुलऑफ आणि स्कुपेस्की यांचा 7-6(8-6), 7-5, डॅनिएल इव्हान्स आणि जॉन पियर्स या जोडीने राजीव रॅम आणि सॅलीसबेरी यांचा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत पुरुष एकेरीत रशियाच्या टॉप सिडेड मेदवेदेवने विजयी सलामी देताना निकोलाझ बॅसीलासेवेलीचा 6-2, 6-2, कॅनडाच्या शेपोव्हॅलोवने टेलरप्रिजचा 6-1, 4-6, 6-3 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.