प्रतिनिधी/ म्हसवड
दहिवडी आगाराची दहिवडी-नातेपुते बस शिंगणापूर घाट चढत असताना अचानक बेक फेल झाल्याने मागे मागे येऊ लागली. बस सुमारे 150 ते 200 फूट दरीत कोसळणार तोच चालकाने प्रसंगावधान राखत बस डोंगर कपारीच्या बाजूला वळल्याने डोंगर कडय़ाला धडकली. बसमध्ये एकुण 35 प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत वगळता सर्व प्रवाशी सुखरुप असल्याने चालक उमेश खरात याचे प्रवाशांसह नागरिकांनी कौतुक केले.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवार 28 रोजी दहिवडी आगाराची दहिवडी नातेपुते ही बस सकाळी 11 वाजता दहिवडी येथून 36 प्रवाशांना घेऊन चालक उमेश खरात (रा. शेवरी ता. माण) व वाहक जाधव हे नातेपुतेकडे वावरहिरे, शिंगणापूर मार्गावरून मार्गस्थ झाली. दुपारी बारा वाजता ही बस शिंगणापूर बस स्थानकात पोहोचवली. येथील 11 प्रवाशी शिंगणापूर येथे उतरल्याने बसमध्ये 25 प्रवाशी उरले होते तर शिंगणापूर बसस्थानकातुन 10 मध्ये बसमध्ये बसले. 35 प्रवाशी घेऊन दुपारी 12 च्या दरम्यान दहिवडी नातेपुते बस नातेपुते घाटातून जात होती. मोठय़ा वळणाच्या चढावर गियर बदलत असताना दुपारी 12.30 च्या दरम्यान बसचा ब्रेक लागत नाही हे चालकाच्या लक्षात आले. तोवर बस उताराने मागे मागे सरकत होती. डाव्या बाजूला खोल दिडशे ते दोनशे फूट खोल दरी तर उजव्या बाजूला डोंगराचा कडा होता.
चालक खरातने एक क्षणाचाही विचार न करता बसमधील 35 प्रवाशाचे जिव वाचवण्यासाठी स्टेरिंग ताकतीने वळवत बस डोंगराच्या कडय़ाला रिव्हर्सने धडकवली आणि 35 प्रवाशांचे जिव वाचवले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जिव भांडय़ात पडला. या अपघातात तिघे किरकोळ जखमी झाले तर बसची काच फुटून नुकसान झाले.