शिराळा/वार्ताहर
रेड ( ता.शिराळा ) येथे मोटारसायकल व चारचाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकल वरील एक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. गौतम कालिदास घाडगे ( वय ३५ रा. तुपारी वसाहत ताकारी. ता पलूस) असे मयत व्यक्तीचे तर निलेश अर्जुन हत्तेकर (वय२६ रा.ताकारी, ता. पलूस ) असे गंभीर जखमीचे नाव आहे. सदर घटना मंगळवार दि.१ रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलेश हत्तेकर व मयत गौतम घाडगे हे मोटारसायकल (क्रमांक एम एच १० डी इ ५८८८ ) या मोटरसायकलवरून शिराळ्याकडून इस्लामपूरकडे जात होते. तर सुशांत गोरख गायकवाड हे चारचाकी गाडी ( क्रमांक एम एच १० सी एन o ०६५७ ) मधून इस्लामपूरहून शिराळ्याकडे येत होते. यावेळी या दोन्ही गाड्यांची रेड हद्दीत समोरासमोर धडक झाली. यामध्ये मोटारसायकल वरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री साडे नऊच्या दरम्यान गौतम घाडगे यांचा मृत्यू झाला. यातील गंभीर जखमी निलेश हत्तेकर यांचे वर उपचार सुरू आहे.