हुबळी, मंगळूर, म्हैसूरमध्ये कारवाई ः एकूण चौघांना अटक
प्रतिनिधी, वार्ताहर/ बेंगळूर, हुबळी
पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने नुकतीच 5 वर्षाची बंदी घातली आहे. त्यानंतरही राज्यात या संघटनेच्या हस्तकांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) छापे सुरुच आहेत. शनिवारी एनआयएने हुबळी, मंगळूर, म्हैसूरसह विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या कारवाईवेळी पीएफआय हस्तकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली. फरार असणाऱया काही नेत्यांविषयी माहिती देखील मिळविण्यात आली आहे.
हुबळी शहरातही एनआयएच्या अधिकाऱयांनी एसडीपीआयच्या एका नेत्यावर छापा टाकला. जुने हुबळीतील नुरानी प्लॉट येथील एसडीपीआयचे नेते इस्माईल नालबंद यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास अधिकाऱयांनी छापा टाकून निवासस्थानाची झडती घेतली. त्याचप्रमाणे नालबंद यांच्या कसबापेठ पोलीस स्थानक हद्दीतील कार्यालयावरही छापा टाकून माहिती जमविण्यात आली आहे.
इस्माईल नालबंद यांचा मुलगा पीएफआय संघटनेत सक्रिय असल्याच्या संशयावरुन शनिवारी पहाटे एनआयएच्या चार अधिकाऱयांच्या पथकाने नुरानी प्लॉट येथील निवासस्थानावर छापा टाकला. पीएफआय संघटनेशी संबंधीत काही कागदपत्रेही ताब्यात घेतली असून त्याची पडताळणी करण्यात आली आहे. सुमारे 5 तास नालबंद दाम्पत्याची एनआयएकडून चौकशी करण्यात आल्याचे समजते.
इस्माईल यांचा मुलगा बेळगावला गेला असल्याने त्याला बोलावून आपल्यापुढे हजर करा अशी सूचनाही इस्माईल नालबंद यांना एनआयएच्या अधिकाऱयांनी केल्याचे समजते. इस्माईल एसडीपीआयचे धारवाड जिल्हा मुख्य सचिव असून त्यांची पत्नी हुबळी-धारवाड महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्र. 75 मधून पराभूत झाली होते.
म्हैसूरमध्ये पीएफआय संघटनेचा माजी सचिव सुलेमान याला मंडी मोहल्ला येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली. त्याची अज्ञात स्थळी चौकशी केली जात आहे.
आणखी तिघांना अटक
भाजपचे मंगळूरमधील युवा नेते प्रवीण नेट्टारु यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेला बेळ्ळारे ग्रामपंचायतीचा सदस्य इक्बाल बेळ्ळारे, एसडीपीआयचा राज्य सचिव शफी बेळ्ळारे आणि सुळ येथील इब्राहिम शा या तिघांना एनआयएने अटक केली आहे. अटकेतील आरोपींची चौकशी सुरु असून उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी मंगळूर जिल्हय़ातील पुत्तूरच्या आसपास एनआयएच्या अधिकाऱयांनी शोध सुरु केला आहे.
पीएफआय आणि या संघटनेशी संलग्न असणाऱया संस्थांवर केंद्र सरकारने 5 वर्षासाठी बंदी घातली आहे. सप्टेंबर महिन्यात यासंबंधी आदेश जारी करण्यात आला होता. बंदी संबंधी दिलेल्या अधिसूचनेत प्रवीण नेट्टारु हत्या प्रकरणाचा उल्लेखही करण्यात आला होता. त्यामुळे प्रवीण नेट्टारु हत्या प्रकरणात पीएफआय संघटनेच्या हस्तकांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. यामुळे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएने फरार असलेल्या प्रमुख चार आरोपींच्या अटकेसाठी जनतेची मदत मागितली आहे. आरोपींची माहिती देणाऱयांना एकूण 14 लाखांचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे.