आनंदापोटी गोळीबार करणे गुन्हा
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांदरम्यान राज्य सरकारने शस्त्रांचे परवाने जारी करण्याची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा उपायुक्तांचे समाधान होईपर्यंत कुठलाच नवा परवाना जारी केला जाणार नाही. तसेच शस्त्रांच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी असणार आहे. आनंदापोटी म्हणजेच विवाह सोहळय़ावेळी गोळीबार केल्यास त्याला गुन्हा मानले जाणार आहे. पंजाबमधील बिघडती कायदा-सुव्यवस्था पाहता राज्य सरकारकडून शस्त्रांच्या परवान्याची समीक्षा करविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात किती लोकांकडे शस्त्र परवाने आहेत, परवाने कुठल्या आधारावर देण्यात आले इत्यादी गोष्टींची समीक्षा करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये अलिकडेच हिंदुत्ववादी नेते सुधीर सूरी यांची हत्या परवानायुक्त शस्त्राचा वापर करत करण्यात आली होती. सोशल मीडियावर कुणी शस्त्रासह पोस्ट शेअर करत असेल तर त्याच्या विरोधात आता कारवाई केली जाणार आहे. तसेच शस्त्रs अन् हिंसेला चिथावणी देणाऱया गीतांवरही पूर्णपणे बंदी घातली गेली आहे.