ऑनलाईन टीम / तरुण भारत :
छ. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)हे शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj) वंशज आहेत. ते हतबल होऊ शकत नाहीत. ते भावनिक होऊन बोलले असतील. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छ. शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. काल खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते भावूक झाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठा प्रेरणास्रोत कोणीच असू शकत नाही, आमचे आणि सर्वांचे तेच आदर्श आहेत. छ. उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. ते भावनिक होऊन बोलले असतील. मात्र, ते हतबल होणार नाहीत. किंबहुना आम्ही त्यांना हतबल होऊ देणार नाही. राज्यपालांची नियुक्ती सरकार नाही, तर राष्ट्रपती करतात. त्यामुळे सरकार यात काही करू शकत नाही. राज्यपालांच्या संदर्भात अधिकार राष्ट्रपतींना आहेत.
अधिक वाचा : WHO कडून ‘मंकिपॉक्स’चे नामांतर; ‘हे’ असेल नवे नाव
दरम्यान, मंत्रालय जे सत्तेचे सर्वोच्च स्थान आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराज, आई जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तैलचित्रे आहेत. तेथे महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचीही तैलचित्रे असली पाहिजेत, अशी कल्पना होती. त्याला आम्ही गती दिली. आज या तैलचित्रांचे अनावरण झाले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.